वीज मंडळाच्या नळजोडण्या तोडल्या, रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:00 PM2018-08-07T17:00:32+5:302018-08-07T17:03:38+5:30
रहाटाघर वीज उपकेंद्र, वीज मंडळाचे नाचणे कार्यालय व वीज मंडळाची कॉलनी यांच्या नळपाणी जोडण्या नगर परिषदेने गेल्या दोन दिवसांमध्ये तोडल्या आहेत. त्यामुळे वीज मंडळ व रत्नागिरी नगर परिषद यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : वीज पुरवठ्यातील अनंत समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही महावितरण कंपनी रत्नागिरी नगर परिषदेला सहकार्य करीत नाही. त्यामुळे चूक महावितरणची व त्रास नाहक नगर परिषदेला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महावितरण सहकार्य करीत नाही तर नगर परिषदही महावितरणला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका घेत रहाटाघर वीज उपकेंद्र, वीज मंडळाचे नाचणे कार्यालय व वीज मंडळाची कॉलनी यांच्या नळपाणी जोडण्या नगर परिषदेने गेल्या दोन दिवसांमध्ये तोडल्या आहेत. त्यामुळे वीज मंडळ व रत्नागिरी नगर परिषद यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
याबाबत नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. पंडित म्हणाले, रत्नागिरी शहरात रहाटाघर येथे गेल्या चार वर्षामध्ये विद्युत उपकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, हे उपकेंद्र कधी सुरू तर कधी बंद अशी स्थिती आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
मात्र, कंत्राटदाराने चांगले काम केले नाही. त्यामुळे हे उपकेंद्र सातत्याने बिघाडाच्या चक्रात अडकले आहे. त्याचा परिणाम शहरातील विद्युत पुरवठ्यावर होत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. शहरातील पथदीप बंद राहात आहेत, असे ते म्हणाले.
बदला घेणार ?
सहकार्य न करणाऱ्या वीज मंडळाला असहकार्य करीत मंडळाच्या नळजोडण्या तोडल्या आहेत. त्यामुळे अशीच कारवाई वीज मंडळही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शीळ येथील पाणी योजनेचा वीज पुरवठा आधीच खंडित होतो. हा पुरवठा बंद केला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकेल.
नळजोडणी तोडली
नगर परिषदेने शहरातील रहाटाघर उपकेंद्राची नळपाणी जोडणी कापली आहे. नाचणे येथील वीज मंडळाच्या प्रमुख कार्यालयाची २ इंची नळजोडणीही तोडण्यात आली आहे.