ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 03:16 AM2018-10-12T03:16:15+5:302018-10-12T03:16:44+5:30
या नवरात्रात नवविध भक्ती करेन. श्रवण, स्मरण करतेच, पूजनही करेन. मनोमन तिची पूजा करेन.
- शैलजा शेवडे
नवविध भक्तीचे करीन नवरात्र
करोनी पोटी मागेन ज्ञान पुत्र
आईचा जोगवा, जोगवा मागेन
या नवरात्रात नवविध भक्ती करेन. श्रवण, स्मरण करतेच, पूजनही करेन. मनोमन तिची पूजा करेन.
देवीची मानसपूजा
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये,
पायघड्या या स्वागत उत्सुक, प्रसन्नवदने ये ।
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये,
मानसपूजा तुझी मांडली, भक्तवत्सले ये ।
बैस गं आई चौरंगावर,
पाणी घालते, पदकमलांवर,
आनंदाच्या लहरी केवळ,
स्पर्श तुझ्या चरणांचा दे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
आई तुला गं स्नान घालते,
धूप दीप, फळं फुलं अर्पिते,
गंगायमुना नेत्री दाटल्या,
भावपूर्ण प्रणिपात घे, ये अंबे ये,
माझ्या मनमंदिरी ये ।
आज आई गं तुला नटविते,
भरजरी साडी, वेणी देते,
अलंकार घे सौभाग्याचे,
आरशात बघ, हास्य दे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
तुझ्याचसाठी, रांधिली मी गं,
पुरणवरण, अन खीर पक्वान्नं,
जेव गं आई आनंदाने,
तृप्तीची मग पोच दे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
आई तुझी ही लेक बावरी,
रिझविण्या तुज गाणी गाई,
आनंदाने नाचही मग करी,
कौतुकाने ताल दे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
विश्वजननी, गिरिजा तू गं,
तुझ्यामुळे, अन तुझीच मी गं,
तुझ्याच ठायी अर्पियते गे,
सर्व काही दुर्गे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।
उठता, बसता, फिरता चित्ती,
एक जाणीव तुझीच भक्ती,
प्रमाद माझे अनंत तरीही,
पदरी मजला घे,
ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।