देवभीरू होऊ नका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 05:13 AM2019-11-27T05:13:29+5:302019-11-27T05:13:47+5:30
आजकाल लोक देवाबद्दल जी चर्चा करतात, म्हणजे जर तुम्ही मंदिर, चर्च, मशीद किंवा इतर कुठल्या प्रार्थनास्थळी जाऊन आठवड्याचा त्याचा हप्ता दिला नाही, तर तो तुमच्यावर रागावणार, तुमच्या मुलांना रोगिष्ट करणार आणि तुमच्या धंद्याचे तीन तेरा करणार.
- सदगुरू जग्गी वासुदेव
आजकाल लोक देवाबद्दल जी चर्चा करतात, म्हणजे जर तुम्ही मंदिर, चर्च, मशीद किंवा इतर कुठल्या प्रार्थनास्थळी जाऊन आठवड्याचा त्याचा हप्ता दिला नाही, तर तो तुमच्यावर रागावणार, तुमच्या मुलांना रोगिष्ट करणार आणि तुमच्या धंद्याचे तीन तेरा करणार. थोडी-फार जाण असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा ठिकाणी जावंसंदेखील वाटणार नाही. दैवी तथ्य अशा बालिशपणाने आपण चित्रित केले आहे.
देवाला घाबरणारे होऊ नका. दैवी गोष्टी भयभीत होऊन तुम्ही शोधू शकणार नाही. जे काही तुम्ही करत आहात, जर ते भीतिपोटी करत असाल, तर नक्कीच त्यातून तुमचं कल्याण होणार नाही. अंतत: त्याचे परिणाम तुमच्यासाठी हितावह असणार नाहीत. जर भय तुमच्या समोर आलं, तर त्याच्याकडे पाहा आणि व्यवस्थित हाताळा. तुमच्या भयाचा मूळ आधार काय? तुमच्या मर्यादा हाच भयाचा मूळ आधार आहे. ‘काय होईल’ हाच भीतीचा मूळ आधार आहे, पण शेवटी तुम्हाला काय होणार? फार तर एक दिवशी तुम्ही मरणार. म्हणून तुमचे आयुष्य संपूर्णपणे जगा.
तुम्हाला खरोखर मनापासून जे काही करायचं आहे, त्या गोष्टी करा. शेवटी काय होणार आहे़ कोणाला माहीत? पण काही केल्या एक दिवस तुम्ही मरणार हे तर नक्की, प्रश्न केवळ हा आहे, आज की उद्या, एवढंच.
जर या भीतिपोटी, तुमचं मन ज्याच्यासाठी तळमळतंय ते केलं नाहीत, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे निर्माण करायचंय ते निर्माण केलं नाहीत, तर तुम्ही तुमचं आयुष्य सुरू होण्याआधीच वाया घालवाल. म्हणून देवाकडे ‘मला काही नको होऊ दे, मला काही नको होऊ दे’ अशा प्रार्थना करू नका. माझ्या जीवनात सर्वकाही घडू दे, अशी प्रार्थना आणि याचना करा. तुमच्या जीवनात सर्वकाही घडू द्यात! प्रत्यक्ष जीवन तुमच्या आयुष्यात घडो!