आनंद तरंग - आहार तसा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 05:34 AM2019-11-04T05:34:59+5:302019-11-04T05:36:25+5:30
‘भूक’ ही माणसाच्या पाठीमागे लागलेली नैसर्गिक प्रक्रिया आहे
प्रा. शिवाजीराव भुकेले
‘भूक’ ही माणसाच्या पाठीमागे लागलेली नैसर्गिक प्रक्रिया आहे. उच्चपदस्थापासून ते भणंग भिकाऱ्यापर्यंत साऱ्यांचीच धडपड भाकरीसाठी चाललेली आहे. फरक एवढाच की, भणंग भिकाºयाच्या झोळीत कोरभर भाकरी पडली की, तो देणाºयाला आशीर्वाद देऊन एखाद्या खडकावर बसून भाकरी खातो. याउलट अनेक उच्चपदस्थ पंचतारांकित हॉटेलमध्ये साजूक तुपातल्या नळ्यांवर आणि कधीतरी पोळ्यांवर ताव मारतात, पण नळ्या आल्या की, मद्याचे चषक रिते होणे आलेच. एकदा नळी आणि मदिरा नावांची चंचला पोटात रिचवली की, चालणारा रांगू लागतो आणि रांगणारा आडवा होऊ लागतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात असू द्यावी की, माणसाचे जर पशूत रूपांतर व्हायचे नसेल, तर माणसाने जगण्यासाठी खावे खाण्यासाठी जगू नये. कारण माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की, त्याला पोटाच्या भुकेबरोबर वेगवेगळ्या ‘भुका’ लागलेल्या आहेत. कधी-कधी तो गरज नसताना नको ते खात राहतो, तर कधी गरज असताना त्याला खायलाच मिळत नाही. जर त्याचा प्राण अन्नमय आहे, तर त्याने खाल्लेच पाहिजे, परंतु काय खाल्ले पाहिजे, याचा सारासार विवेक प्रकट करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
जैसा घेणे आहार, धातु तैसाची होय आकार
आणि धातु ऐंसा अकार, भाव पोखे ॥
म्हणौनिक सात्त्विक रस सेवीजे, तै सत्त्वीच वाढी पाविजें ।
राजसा तमसा होईजे, येरी रजीं॥
ज्ञानेश्वर माउलीने आहाराचे तामस, राजस आणि सात्त्विक असे तीन प्रकार सांगितले आहेत. सर्वसाधारणपणे जे माणसाने खाणे योग्य नाही, तो तामस आहार होय. वाघ-सिंंहाने अख्खी बकरी आणि हरीण खावे, पण माणसाने मात्र मेंदूला चांगल्या रक्ताचा पुरवठा होण्यासाठी व चांगल्या विचारांचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी सात्त्विकआहार घ्यावा. याचा अर्थ असाही नाही की, सगळीच शाकाहारी माणसे सात्त्विक विचारांची असतात. बºयाच वेळी त्यांच्यासुद्धा ‘मुँह में राम आणि बगल में छुरी’ असते. आहार घेताना वृत्ती जर तमोगुणी असेल, तर शुद्ध शाकाहार घेऊन तरी काय उपयोग? पण त्याने वाघासारखी अख्खी बकरी किंवा हरीणही खाऊ नये आणि कुत्र्या-मांजरासारखे चार-आठ दिवस कुजवून ठेवलेले ‘धाबा संस्कृती’मधील मद्य, मासही खाऊ-पिऊ नये. निरुपद्रवी प्राण्यांना खाऊन टाकणाºया अशा माणसांच्या विषयी संत कबिराने म्हटले होते -
बकरी पाँती खात है, ताकी काढीखाल
जो जान बकरी खात है, उनका कौन हवाल।
आपण काय खातोय? हे सुद्धा न दिसण्याच्या ‘रात्री’ भारतात पशुत्वाचा अंधकार दाटून आणत असताना सात्त्विकशाकाहाराचा माझ्यासारख्या पापभिरूमाणसांनी आग्रह धरणे हे फारच मागासलेपणाचे होईल नाही का? पण निदान आपण काय खातो? कोठे खातो? कुणाचे खातो? जो आज फुकटचे खायला घालतोय, त्याने आज बकºयाच्या मानेवर सुरी फिरवलीय. उद्या आपल्याच मानेवर तर फिरवणार नाही ना? याचा विवेक तरी खाणाºयाच्या ठिकाणी असावा. सर्वांनीच शाकाहारी खाणे सुरूकेले, तर उद्या पृथ्वीचा लगेच स्वर्ग होणार नाही, पण ज्यावेळी जेवढे आवश्यक आहे तेवढेच खाल्ले, तर अनेक निरोगी माणसेच या पृथ्वीचा स्वर्ग करतील, या वैद्यकीय तत्त्वावर मात्र माझा विश्वास आहे. महावीर, कबीर, बसवेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम आदी प्रेषितांनी शुद्ध शाकाहाराचा आग्रह केवळ एवढ्यासाठीच धरला होता की, यामुळे अहिंसक प्रवृत्तीच्या सज्जनांची मांदियाळी निर्माण होईल.