स्वत:चा हिशेब करण्यासाठी तू स्वत:च पुरेसा आहेस... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 11:21 AM2018-10-10T11:21:02+5:302018-10-10T11:22:37+5:30

माणूस स्वत:ला पटकन् क्षमा करतो. इतरांच्या कृत्याची मात्र स्वत:जवळ नोंद ठेवतो. त्याचा हिशेब करण्याचा सदैव प्रयत्न करतो. परंतु, कुराणमधील अध्याय १७ च्या आयात

Adhyatmik : You are enough to calculate yourself ... | स्वत:चा हिशेब करण्यासाठी तू स्वत:च पुरेसा आहेस... 

स्वत:चा हिशेब करण्यासाठी तू स्वत:च पुरेसा आहेस... 

googlenewsNext

धर्मराज हल्लाळे

माणूस स्वत:ला पटकन् क्षमा करतो. इतरांच्या कृत्याची मात्र स्वत:जवळ नोंद ठेवतो. त्याचा हिशेब करण्याचा सदैव प्रयत्न करतो. परंतु, कुराणमधील अध्याय १७ च्या आयात १४ मध्ये जे लिहून ठेवले आहे, ते माणसाला दिशा देणारे आहे. माणसाने स्वत:च आपल्या कृत्याची नोंद वाचावी अन् स्वत:चा हिशेब करण्यासाठी तो स्वत:च पुरेसा असतो, असे त्यात म्हटले आहे. माणसाने संपूर्ण दिनचर्येचा हिशेब ठेवला पाहिजे. सकाळी उठल्यापासून तो निद्राधीन होईपर्यंत ज्या काही कृती करतो, त्याची नोंद आपल्या अवतीभोवतीची माणसे ठेवतात. समाज लक्ष ठेवतो. त्याहीपेक्षा स्वत:चे मन हे स्वत:च्या कृतीसाठी ग्वाही देत असते. चुकल्याक्षणी तू इथे चुकला आहेस, हे बजावले जाते. परंतु, मानवी वृत्ती त्याकडे हळुवारपणे दुर्लक्ष करते. स्वत:च्या चुकांवर एकप्रकारे आपण पांघरुण घालतो. आपल्याला कळते की, आपण चुकलो आहोत. मात्र वळत नाही. स्वत:ला दुरुस्त करण्याचीही तयारी नसते. लोभ, माया, अभिलाषा स्वस्त बसू देत नाही. जे स्वलाभाचे ते आणखी मिळावे. जे मिळते ते स्वत:लाच मिळावे, ही सामान्य प्रवृत्ती असते. खरे तर धर्म प्रार्थना ही मानव कल्याणाची असते. स्वत:ला सुखी ठेवण्याची धडपड करताना समाजाला अर्थात सर्वांना सुखी करण्याची प्रार्थना केली जाते. ती केवळ उक्तीपुरती असते. कदाचित उपचाराचा भाग बनलेली असते. प्रत्यक्ष कृती करताना मात्र स्वकल्याण, कुटुंबकल्याण यापलीकडे पाहण्याची वृत्ती जोपासली जात नाही. 

कुराणमधील आयातीत असे म्हटले आहे की, तुम्हीच तुमच्या कृत्याच्या नोंदी वाचा. तुम्ही स्वत: आत्मपरीक्षण करा. जिथे तुम्ही चुकला आहात तिथे तुम्ही आत्मटीका करा. अर्थात स्वत:चा हिशेब, स्वत:चे परीक्षण करण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही आवश्यकता नाही, ते तुम्हीच करा. हा हिशेब प्रामाणिकपणे केला तर आपणाला सद्मार्ग सापडेल. आपल्या चुका दिसतील, त्या दुरुस्त करण्याची संधी मिळेल. जो ही संधी मिळवितो, तोच स्वत:चे भले करतो. ज्यांना स्वत:चा हिशेब करायचा नाही, आपले वागणे, बोलणे बेहिशेबी ठेवायचे आहे, त्याच्या जीवनात अंधकार पसरल्याशिवाय राहत नाही. एकार्थाने पवित्र कुराणात जे म्हटले आहे, ते आपल्या जीवनात अंमलात आणले तरच कल्याण होईल. त्यासाठी प्रत्येक क्षणी आपल्याकडून घडणाऱ्या कृत्यांची नोंद ठेवा. ज्या नोंदी मानवी कल्याणाच्या आड येतात, त्या पुसून टाका. त्याची पुनरावृत्ती करू नका. हिशेबातून सद्गुणांची बेरीज व्हावी. दुर्गुणांची वजाबाकी व्हावी. आपले भलेबुरे आपल्याला कळत असते. त्याचा हिशेब ठेवला तर कोणते पारडे जड होत आहे, हेही कळते. चुकांच्या नोंदींचे पारडे जड होत असेल तर धोक्याची घंटा समजावी. त्याच क्षणी सद्मार्गाचा अवलंब करावा. त्यासाठी वृद्धापकाळाची प्रतीक्षा करणे उचित नाही. आपले हिशेबाचे खाते सद्गुणांनी परिपूर्ण करायचे असेल तर आजपासूनच सुरुवात करावी लागेल.

Web Title: Adhyatmik : You are enough to calculate yourself ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.