अध्यात्म - तरुणांनो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:30 AM2018-08-13T00:30:00+5:302018-08-13T00:30:42+5:30

शिकागोच्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी पहिले भाषण केले हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून. ते भाषण गाजले त्यातील पहिल्या दोन शब्दांनी. माय ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ अमेरिका हे ते शब्द. बस आपण इथेच थांबलो.

Adhyatmik - Youths | अध्यात्म - तरुणांनो

अध्यात्म - तरुणांनो

Next

- किशोर पाठक
शिकागोच्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी पहिले भाषण केले हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून. ते भाषण गाजले त्यातील पहिल्या दोन शब्दांनी. माय ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ अमेरिका हे ते शब्द. बस आपण इथेच थांबलो. एखाद्या व्यक्तीचं गुणगान करताना त्याला क्षणात संपवण्याचा हा खेळ आहे. सगळ्या लोकोत्तर पुरुषांचं हेच केलं आपण. सावरकर - समुद्रात टाकली उडी, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग. सांगायचं एवढंच की महामानव आपण एखाद्या घटनेत संपवले. शिवाजी महाराज आपण एका घोषणेत बसवले. जय भवानी जय शिवाजी. आजच्या काळात फुले-शाहू-आंबेडकर आपण एका वाक्यात बसवले. ते आपल्या सोयीचे केले. तरुणांसाठी. त्यांना शॉर्टकट हवाय. खूप वाचाय-लिहायला वेळ नाही. एखाद्या व्यक्तीचं सर्व बाजूंनी आकलन करायचं नाही. कोणताही प्रश्न सर्व बाजूंनी समजून घ्यायचा नाही. म्हणून मग सोपं उत्तर घोषणा, एकत्र येणं. संघटन म्हणून नाही जमाव म्हणून एकत्र येणं. मग त्या जमावाला चेहरा नसतो. असते एक आॅर्डर कुण्या नेत्याने केलेली. तरुण पुकारतो पुढे जातो मग तोडफोड करा. गाड्या जाळा, दंगल करा, तो बेभान होतो. झालं. राजकीय संपत्तीचं नुकसान करून तो मोकळा होतो. मोकळा कसला बांधला जातो. कुठे तरी कॅमेऱ्यात तो बंदिस्त होतो. मग ससेमिरा, धरपकड तो पकडला जातो. त्याच्याकडून इतरांची नावे वदवली जातात. तो पुरता अडकतो. दप्तरी त्याची गुन्हेगार म्हणून नोंद होते. केस चालत राहते. तशी तारुण्याची नशा संपत जाते. आपण हे काय करून बसलो. आता आपल्याजवळ कोण आहे? कोण आहे पाठीराखा? कोण तारणहार? भडकवणारा नेता जागेवर नाही. तो एकतर मोठा झालेला. व्यस्त असलेला. तरुण भग्ण भिरभिरतोय. नोंद झाल्याने सरकारी वा चांगल्या पगाराची नोकरी नाही. जॉब नाही. म्हणून लग्न नाही. मुलीला काम करणारा मुलगा लागतो. तरुण एखादी पोरगी मनात भरते. म्हणजे फक्त संबंधांपुरती हवी असते. ती त्याला नकार देते. मुलगा झिंगाट होतो. तिला दम देतो. तोंडावर अ‍ॅसिड फेकीत तुझ्या घरात येऊन नासवीन. ही भाषा होते. त्यातून विपरीतच घडतं. तेव्हाही मुलगा एकाकीच असतो. हा आजचा तरुण. दिशाहीन. त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे. तो खूप काही करू शकतो. त्याला वापरणारे आणि वापरू देणारे शोधायला हवेत. महामानव जन्मभर हेच सांगत आले. तरुणांना पाहायला वेळ नाही. अधोगतीला पर्याय नाही. हे तरुण बदलायला हवेत. ते योग्य मार्गाने जायला हवेत. मगच म्हणू या माय ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स!
 

Web Title: Adhyatmik - Youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.