अक्षय्य तृतीया 2018: काय आहे महत्व, कधी आहे पूजा विधीचा शुभ मुहूर्त?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 11:31 AM2018-04-17T11:31:43+5:302018-04-17T11:55:48+5:30
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.
काय आहे महत्व?
ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शुक्राचा अस्त झालेला असेल तर विवाहासारखे मंगल कार्ये करू नयेत, असेही मानले जाते.
सांस्कृतिक महत्व
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजन करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ आणि पन्हे देतात. त्या हळदी कुंकू समारंभांचा अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.
सोने खरेदी करण्याची परंपरा
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला खास परंपरा आहे. असे मानले जाते की, या दिवशी सोने खरेदी केल्यास घरात सुखसमृद्धी येते. इतकेच नाहीतर अक्षय्य तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने अनेक नव्या गोष्टींची सुरुवात याच दिवशी केली जाते.
पूजेचा शुभ मुहूर्त
अक्षय्य तृतीयेला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 56 मिनिटांपासून सुरु होऊन दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे.
सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त
या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 56 मिनिटांपासून सुरु होऊन रात्री 12 वाजेपर्यंत आहे.