...पण कधीतरी त्या डोकं वर काढतातच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 04:55 AM2020-01-09T04:55:46+5:302020-01-09T04:55:51+5:30
स्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत.
- शैलजा शेवडे
स्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामीजींचा ‘यत्र जिवो तत्र शिव:’ हा विचार, ‘उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’ हा संदेश, त्यांचा ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. त्यांची ज्ञानोत्तर भक्ती, त्यांचा अद्वैतवाद! हा सगळा अभ्यास, चिंतन, मनन सर्व केवळ आनंददायी! त्यांनी सांगितले, ‘प्रत्येकात ईश्वर आहे. अंतर्मन आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून दैवी अंशास जागे करा.’ परकीय सत्तेच्या तडाख्याने खचून गेलेल्या, स्वत्त्वाचे तेज विसरून गेलेल्या हिंदू बांधवांना त्यांनी संघटित केले. त्यांना गती, दिशा दिली. उद्घोष केला तो शक्तीच्या, सामर्थ्याच्या उपासनेचा, शरीरबल, मनोबल आणि आत्मबलाच्या उपासनेचा! स्वामी विवेकानंदांनी सगळ्या जगाला हिंदूंच्या अद्वैत सिद्धांताची म्हणजेच वेदांताची ओळख करून दिली. उपनिषदांची ओळख करून दिली. ते सांगत, ‘उपनिषदे हे सामर्थ्याचे अक्षयकोष आहेत. सर्व विश्व गदागदा हलविल असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. सारे विश्व त्याच्या संदेशाने चैतन्यमय होईल. सामर्थ्यमय होईल. विविध वंश, जाती, पंथ यांच्यात जे दीनदुबळे आहेत, त्यांच्यात उपनिषदांचा ललकार सामर्थ्य ओतील, त्यांना मुक्त, निर्भय करील, स्वातंत्र्य-शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य -हे उपनिषदांचे प्राणसूत्र आहे. शक्तीची उपासना हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. हे बंधो, दुर्बल बनू नको! शक्तीची उपासना कर. आपण स्वत:ला दुबळे समजत असतो. पण एकदा स्वसामर्थ्याची ओळख झाली, की कळतं, मी दुबळा नाही. कोणी मला चिरडून टाकू शकत नाही. कबूल आहे, हातून चुका होतात. पण म्हणून स्वत:ला वाईट समजायचं कारण नाही. त्या सुधारू शकतो आपण! मानसशास्त्रज्ञ फ्रोईड म्हणतो, ‘‘माणसाचं मन समाजात दाखवायला, बाहेरून जरी सुसंस्कृत असलं, तरी तो बुरखा असतो. दुष्ट प्रवृत्ती आत कोंडून ठेवलेल्या असतात. पण कधीतरी त्या डोकं वर काढतातच.