आनंदायन : साद... प्रतिसाद... प्रसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 04:40 PM2018-12-03T16:40:30+5:302018-12-04T19:39:05+5:30

‘अरे आनंदा, तुझ्या नावातच आनंद आहे ना रे? मग त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही कामात आपलं लक्ष असायला हवं ना? अस मन लावून केलेलं कोणतंही काम म्हणजे देवाची पूजाच असते. आता हेच बघ ना?

Amazing: Simple ... Response ... Offer! | आनंदायन : साद... प्रतिसाद... प्रसाद!

आनंदायन : साद... प्रतिसाद... प्रसाद!

Next

रमेश सप्रे

घरातील सर्व मंडळी एकत्र येण्याचा कार्यक्रम म्हणजे रात्रीची देवघरात केली जाणारी उपासना. आनंदाला ही वेळ खूप आवडायची. कारण आजी-आजोबा, आई-बाबा, ताई नि स्वत: तो एवढंच नव्हे तर आजीची काळजी घेणारी दाई नि घरातला काम करणारा नोकर विठोबा सारे यायचे नि एकत्र एकसुरात श्लोक, स्तोत्रं, अभंग म्हणायचे.
एवढंच नव्हे तर एरव्ही इकडे तिकडे भटकणारी मनू मांजरीही कुणाच्या ना कुणाच्या मांडीवर विसावायची. विठोबा रोज एक भजन म्हणायचा. किती आर्तता असायची त्याच्या आवाजात! आनंदाला त्या भजनाचा अर्थ कळायचा नाही; पण भाव मात्र त्याच्या हृदयाला स्पर्श करायचा; पण सर्वात जिवाचे कान करून तो ऐकायचा ते मंत्रपुष्पांजलीचे श्लोक, शांतीमंत्र आणि सर्वांचं कल्याण चिंतणारी शेवटची प्रार्थना.
त्या प्रार्थनेतील दुसरा श्लोक म्हणताना तो हमखास चुकायचा. मग आजोबा त्याच्याकडे हसून पाहायचे त्याला आपली चूक कळायची. आज पुन्हा चुकलो म्हणून तोही हसायचा. मग गडबळीनं ती ओळ पुन्हा म्हणत इतरांच्या सुरात सूर मिसळायचा.
कोणता हाता असा तो श्लोक? आपली अशी नेहमी नेहमी चूक कशी होते?
‘सदा सर्वदा’ म्हटल्याबरोबर आपण यांत्रिकपणे ‘योग तुझा घडावा’ असं कसं म्हणतो? प्रार्थनेतील ही यांत्रिकता तिच्यातील मांत्रिकतेला छेद देणारी नव्हे का? एवढे गंभीर विचार करण्याएवढा आनंदा मोठा नव्हता; पण रोज उपासनेनंतर प्रसाद देऊन खाऊन झाल्यावर आजोबा त्याला समजावून सांगायचे.
‘अरे आनंदा, तुझ्या नावातच आनंद आहे ना रे? मग त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही कामात आपलं लक्ष असायला हवं ना? अस मन लावून केलेलं कोणतंही काम म्हणजे देवाची पूजाच असते. आता हेच बघ ना?
‘सदासर्वदा’ म्हटल्याबरोबर तुझी गाडी ‘योग तुझा घडावा’ या चुकीच्या रुळावर जाते ना? उद्या न चुकता श्लोक म्हणायचा बरं का!’
असं म्हटल्यावर आनंदा लगेच पूर्ण श्लोक बरोबर म्हणून दाखवी.
सदा सर्वदा चिंतित देव पाहो।
सदा वृत्ति हे शुद्ध नि:संग राहो।
यश: श्री सदानंद कल्याणमस्तु।
तथास्तु... तथास्तु... तथास्तु... तथास्तु...
या निमित्ताने सर्वांच्या दृष्टीनं आनंद प्राप्तीसाठी एक महत्त्वाचं सूत्र स्पष्ट होत असे. कोणतंही काम उच्च किंवा नीच नाही. बाबा नेहमी म्हणत ‘नो वर्क इज लोवली, एव्हरी कर्व इज होली’ म्हणजे कोणतंही काम खालच्या दर्जाचं नसतं. प्रत्येक काम हे पवित्रच असतं. त्याचं आणखी एक सांगणं सर्वांना जीवनातील महत्त्वाचा पाठ शिकवून जायचं.
‘यंत्र हा देव आहे आणि श्रम ही त्याची पूजा आहे.’ ‘प्रत्येक जण कुठं यंत्र वापरतो? असं विचारल्यावर ते हसत हसत म्हणत, ‘यंत्र म्हणजे कारखान्यातलं मशीन एवढाच अर्थ नाही काही, तर स्वयंपाकघरातही अनेक यंत्रं असतात. स्रानगृहातही असतात. आपली कामाची साधनं, हत्यार ही सारी यंत्रच की! मिक्सर हे यंत्र तसंच पोळपाट-लाटणंही यंत्रच. वॉशिंग मशीन हे यंत्र तशी बादली-लोटा किंवा शॉवर ही सारी यंत्रच. त्यांना देव मानलं, त्यांचा योग्य उपयोग केला, त्यांची स्वच्छता, योग्य निगा राखली की त्यांची पूजाच करणं नव्हे का? दसऱ्याच्या दिवशी या सा-या साधनांची पूजा करणं तसेच पोळ्याच्या दिवशी बैलाची कृतज्ञतापूर्वक पूजा करणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. अशी सवय लागली, अशी मनोवृत्ती तयार झाली की सारं जीवनच एक मंदिर बनून जातं नि प्रत्येक क्रिया-कृती-कर्म बनून जातं अखंड आराधना.
बाबांच्या अशा विचारांचे तरंग आनंदाच्या मनात वारंवार उठत. तो शांत बसून विचार करत असे. हळूहळू जीवन त्याच्यासमोर उलगडत जाई. तो कायम आनंदात असे. त्या श्लोकाचा अर्थ त्याला न कळत समजत असे. तो न चुकता म्हणण्याचा निश्चय करत असे. ‘सदासर्वदा चिंतिता देव पाहो।’ म्हणजे सतत सर्व वस्तूत, व्यक्तीत देवदर्शन झालं तर ‘सदा वृत्ति हे शुद्ध नि:संग राहो।’ म्हणजे मनोवृत्ती शुद्ध पवित्र राहिल आणि कशातही फार गुंतून न पडता आपण त्याची सेवा करत राहू किंवा त्याचा उपभोग घेत राहू, मग हृदयाच्या गाभाºयातून आशिर्वादपूर्वक तथास्तुरुपात जीवनातील यश, वैभव (श्री), कल्याण नि नित्य आनंदासाठी प्रतिसाद मिळेल हा प्रतिसाद म्हणजेच प्रसाद!

Web Title: Amazing: Simple ... Response ... Offer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.