आनंद तरंग - प्रिय वक्तेया होवावे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 06:50 AM2019-01-08T06:50:46+5:302019-01-08T06:51:09+5:30
बा.भो. शास्त्री निसर्गाने वाणी व पाणी माणसाला फुकट दिलं. कसं वापरावं याचा विवेक पण दिला. पाण्याचा वापर नीट केला ...
बा.भो. शास्त्री
निसर्गाने वाणी व पाणी माणसाला फुकट दिलं. कसं वापरावं याचा विवेक पण दिला. पाण्याचा वापर नीट केला नाही. याचे दुष्परिणाम आपण आज भोगत आहोत. दूध व पाणी सारखा भाव झाला. गंगाजलाचं आम्ही गटार केलं. अशीच वाणीही दुश्चित केली. शब्दातून वाहणारी भावना विकारी झाली. आम्ही वाणीची स्वच्छता करायला नको? ‘‘आंधळ्याची मुलं आंधळी असतात’’ हे द्रोपदीचं सदोष वाक्य, ‘‘सुईच्या टोकावर बसेल एवढी माती देणार नाही’’ ही दुर्योधनाची वाणी म्हणजे जहाल विषच, यामुळे महाभारत घडलं. मंथरेच्या जिभेवर रामायण घडलं, वाणी विशुद्ध असावी. माधुर्य असावं. ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी नसली तरी पाण्यासारखी निर्मळ असायला काय हरकत आहे.
‘‘प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यति जंतव:
तस्मात्तदेव वक्त व्यं वचने का दरिद्रता’’
पाणी बागेला दिलं तर, फुलांचा सुगंध व फळांचा रस मिळतो. पाणी उसात गेलं तर गोड होतं. कारल्यात गेलं तर कडू, मिरचीत तिखट होतं. मूळ पाण्यात मुख्य तीन गुण आहेत. त्यात नैसर्गिक स्वच्छता, माधुर्य व शीतलता आहे. हेच गुण वाणीत असले तर, शब्दात थंडावा, मधाळता व शुद्धता येते. या तीनच गुणांनी माणूस मोठा होतो. जनप्रिय होतो. विश्वासपात्र होतो. खरं तर एवढंच पुरेसं आहे. संतांच्या गावाचा परिचय करून देताना तुकोबा म्हणतात,
‘‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ
नाही तळमळ दु:खलेश
तेथे मी राहीन होऊनी याचक
घालितिल भीक तेची मज’’
पाण्याच्या दुष्काळात माणसं मरतात. प्रेमाच्या दुष्काळात माणुसकी मरते. संत म्हणजे आनंदघन, त्यांच्या वाणीतून आनंदाची वर्षा होते. त्यांना कसं बोलायचं गीता शिकवते. ‘‘अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाड.यं तप उच्यते’’ या श्लोकात कसं बोलावं याची शाळाच आहे आणि तो वाग्यज्ञही आहे. श्री चक्रधर शिष्य नागदेव पुजाऱ्याला उद्वेग येईल असं रगेल आवाजात बोलला, ‘‘अगा अगा गुरवा उभा राहे’’ त्याची अभद्रवाणी स्वामींना आवडली नाही. लगेच ते म्हणाले ‘‘तू महात्मा नव्हसी?’’ ‘महात्मेनी प्रिये वक्तेया होवावे’ हाच भाव ज्ञानेश्वर महाराजांनी एका गोड ओवीत सांगितला आहे. ‘‘तैसे साच आणि मवाळ! मितले आणि रसाळ! शब्द जैसे कल्लोळ! अमृताचे’’ सूत्रात वक्तृत्वाचा गाभा सांगितला आहे. हे सूत्र म्हणजे वक्तृत्व शास्त्राचं बिज आहे. वक्त्याने श्रोत्यांच्या भाषेत बोलावं. शब्द प्रेमाने ओथंबावे.