आनंद तरंग - स्वर्गलोकप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 07:17 AM2019-02-23T07:17:06+5:302019-02-23T07:17:24+5:30

पार्था, जो माझा प्राणप्रिय परमभक्त मला सर्व चराचरात पाहतो, तसा तो प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि माझ्यातच संपूर्ण जीवसृष्टीला अनुभवतो

Anand Ripple - Swargalpakti | आनंद तरंग - स्वर्गलोकप्राप्ती

आनंद तरंग - स्वर्गलोकप्राप्ती

googlenewsNext

वामन देशपांडे

यो मां पश्यति सर्वत्र सर्व च मयि पश्यति।
तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति।।

पार्था, जो माझा प्राणप्रिय परमभक्त मला सर्व चराचरात पाहतो, तसा तो प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि माझ्यातच संपूर्ण जीवसृष्टीला अनुभवतो ना, त्याला मी दृश्यरूपात सर्वत्र दिसतो, त्याच्यासाठी माझे अस्तित्व हे निर्गुण निराकार नसते तर ब्रह्मांडव्यापी मी, त्याच्या दृष्टीचा विषय होतो. इतकेच काय तर मी त्यालाच सतत सर्वत्र पाहत असतो. ना मी त्याला निराकार दर्शन देतो तसेच तो मला निराकार नाही. आम्ही दोघेही एकमेकांचा प्रेमभारला प्रत्यक्ष सहवास हर क्षणी लुटत असतो, पार्था...

आपल्या परमभक्तांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला एक फार मोलाचा शाश्वत तत्त्वविचार दिला की, जो साधक भक्त आयुष्यभर साधना करतो, तो कधीच पतनाच्या मार्गावर आपले पाऊल उमटवतच नाही. मृत्यूनंतर तो कधीच दुर्गतीला जात नाही. योगभ्रष्ट साधकाचा मृत्यूनंतरचा प्रवास समजावून सांगताना भगवंत म्हणतात,
प्राप्य पुण्यकृतां लोकांनुषित्वा शाश्वती: समा:।
शुचीतां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो भिजायते ।।

पार्था, आयुष्यभर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी साधना करणारे साधक मृत्युसमयी अनवधानाने आपल्या करीत असलेल्या साधनेपासून क्षणभर का होईना, परंतु विचलित होतात आणि त्यांंना स्वर्गलोक प्र्राप्त होतो. वास्तविक स्वर्गलोकाची प्राप्ती व्हावी हा त्या साधकाचा हेतू नसतो. यज्ञादी कर्मांनी स्वर्गलोकाची प्राप्ती व्हावी म्हणून पुण्यकर्म करून स्वर्गलोक प्राप्त करून घेतात आणि पुण्य संपल्यावर पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतात. योगभ्रष्ट महात्मे त्या हेतूने कधीच प्रेरित होऊन साधना करीत नसतात.
त्यामुळे ते अनंतकाळ स्वर्गात राहूनही स्वर्गसुखापासून पूर्णपणे अलिप्त राहतात. त्यांना तर स्वर्गलोकांबद्दल अजिबात आकर्षण नसते. ते योगभ्रष्ट पुन्हा मृत्यूलोकात शुचीसंपन्न श्रीमंत कुटुंबात जन्म घेतात आणि पुन्हा आपली साधना सुरू करतात असे योगभ्रष्ट पुरूष जे असतात त्यांचा हा शेवटचा जन्म असतो, पार्था..
शुचीसंपन्न श्रीमंत घराण्यात जन्म हा फक्त योगभ्रष्ट पुण्यवान महापुरूषांनाच लाभतो असे भगवंत आपल्या परमभक्ताला, म्हणजेच भक्तश्रेष्ठ अर्जुनाला मोठ्या प्रेमाने सांगतात, कारण अर्जुन हा श्रेष्ठ साधक आहे. भोगविरहित आयुष्य जगणारा, प्रत्यक्ष भगवंतांच्या कृपाशीर्वादाला प्राप्त झालेला अर्जुन म्हणजे तर परमभक्तीचे परमोच्च शिखर होता. विवेक आणि वैराग्याचे मूर्त रूप होता. अर्जुनाची अनेक जन्मांची साधना होती, म्हणून स्वत: भगवंत आपल्या या अत्यंत श्रेष्ठ परमभक्ताचे संरक्षण कवच झाला होता. म्हणून भगवंत त्याला ज्ञानमयी योगभ्रष्ट महाभक्ताच्या मृत्यूनंतर तो योगभ्रष्ट, आपली अपुरी राहिलेली साधना पूर्ण करून कुठल्या महान कुळात अखेरचा जन्म घेऊन मोक्षपदावर आरूढ होतो, ते सांगतात.
अथवा योगिनामेव कुले भवति धीमनाम।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीशम।।
पार्था, हा जो योगभ्रष्ट असतो ना, तो अत्यंत वैराग्यसंपन्न, ज्ञानी ऋषीच्या कुळातच आपला अखेरचा जन्म घेऊन आपली अपुरी साधना पूर्ण करतो आणि परमेश्वराची प्राप्ती करून घेतो. असा हा योगीकुळात जन्म होणे ही मानवी आयुष्यातली अत्यंत दुर्मिळ घटना आहे. पार्था असा जन्म जो लाभतो, तो नि:संशयपणे दुर्लक्ष असतो, ही योगभ्रष्टांची गती तू समजून घे.

 

Web Title: Anand Ripple - Swargalpakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.