आनंद तरंग - कर्मांचा भोक्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 04:41 AM2019-01-12T04:41:28+5:302019-01-12T04:42:09+5:30
पार्था, हे प्रकट दृश्य मायावी विश्व मूलत: माझे जे ब्रह्मांडव्यापी निराकार स्वरूप आहे ना, त्याने पूर्णपणे व्यापलेले आहे.
वामन देशपांडे
भगवंत आपल्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची ज्ञानमयी जाणीव, अर्जुनाचे निमित्त करून, आपल्या सर्वच साधक भक्तांना देताना मोठ्या प्रेमाने म्हणतात,
मया ततमिदं सर्व जगदव्यक्तमूर्तिना।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित:।
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम!
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावन:।।
पार्था, हे प्रकट दृश्य मायावी विश्व मूलत: माझे जे ब्रह्मांडव्यापी निराकार स्वरूप आहे ना, त्याने पूर्णपणे व्यापलेले आहे. हे जे व्यक्त जीव आहेत ना, ते सर्व माझ्यातच स्थित आहेत, हे सत्यच आहे. परंतु मी मात्र दृश्य रूपात त्यांच्यात स्थित नाही आणि ही अवघी जीवसृष्टी माझ्यात स्थित नाही. पार्था, हे तू प्रथम समजून घे की माझी ब्रह्मांडव्यापी शक्ती अलौकिक आहे. संपूर्ण जीवसृष्टीला निर्माण करणारा मी, त्यांचा संपूर्ण योगक्षेम सांभाळणारा मी, मात्र त्या जीवसृष्टीत सूक्ष्म रूपात वावरत असूनही मी त्यांच्यात नाहीे. याचा अर्थ असा की, मी या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्तासुद्धा आहे. तरीही मी या विश्वाशी प्रत्यक्ष निगडित नाही. मी त्या संपूर्ण जीवसृष्टीहून अलिप्तच आहे. सर्व काही मीच आहे, एवढे फक्त तू लक्षात ठेव... सर्व काही एक भगवंतच आहेत या शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी, प्रत्येक साधक भक्ताने ज्ञानमार्गाने साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या भोवतीच्या सर्व मोहमयी वस्तू, मूलत: मर्त्य आहेत आणि भोगाची लालसा सळसळत ठेवणारे हे आपले शरीरही मर्त्यच आहे. फक्त परमेश्वर अमर्त्य आहे हे भान अष्टौप्रहर जपणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण आणखी एक लक्षात ठेवणे आवश्यक आहे की भगवंत एकूणच जीवसृष्टीचे कल्याणच करतात.
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति।।
मानवी आयुष्यात जेवढी म्हणून शुभ आणि पवित्र कर्मे घडतात ना त्या सर्वच कर्मांचा भोक्ता एक परमेश्वरच असतो. आपण कुठलेही कर्म जे करतो, ते कर्म परमेश्वराला फळासहित अर्पण करतो. याचा अर्थ असा की, आपण परमेश्वराने निर्माण केलेल्या त्या दृश्य विश्वातल्या परमेश्वरी तत्त्वानेच भारलेल्या व्यक्तीचे जे कर्म करतो ते त्या व्यक्तीच्या निमित्ताने परमेश्वराचेच असते. म्हणून भगवंत म्हणतात, ‘‘पार्था यज्ञ असो वा तप असो, त्याचा भुकेला तर मीच आहे. मीच तर संपूर्ण जीवसृष्टीचा सुहृद आहे. हे जो जाणतो, त्यालाच फक्त परमशांतीचा अनुभव येतो.’’
कामनावृत्ती करीत असलेल्या साधनेला परमेश्वरी प्राप्तीपासून दूर नेते, हे खूपशा साधकांच्या लक्षातच येत नाही. कामना, वासना, स्वार्थबुद्धी, द्वेषभावना हे मूलत: माणसाचे खरे शत्रू आहेत. साधकाने या शरीरांतर्गत शत्रूंचा विनाश करून, मगच आपल्या साधनेला सुरूवात करावी. भगवंतांनी हा श्रेष्ठ विचार प्रकट करताना आपल्या परमशिष्याला उपदेश दिला की,
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते।
एतैर्विमोह्यत्येष ज्ञानमावृत्य देहिनम।
पार्था, प्रत्येक इंद्रियामध्ये वासनेचा वास हा असतोच. माणसाच्या अंतस्थ वासना पूर्ण झाल्या तरच त्याला समाधान आणि शांतीचा लाभ मिळतो. परंतु या वासनांच्या प्राप्तीत जर अडथळे आले तर राग, द्वेष, मत्सर क्षणात जागे होतात कारण हे राग, द्वेष, मत्सर तर त्या इंद्रियांमध्येच स्थित असतात.
प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की त्यांना त्वरीत जाग येते. म्हणजे काय तर मानवी आयुष्याला सर्पवेटोळे घालून बसलेले हे बलाढ्य शत्रू पारमार्थिक आयुष्यात सतत विघ्ने आणीत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर ही इंद्रिये मन, बुद्धी हीच तर वासनेची निवासस्थाने आहेत. ही कामनावृत्ती सतत जागृतावस्थेतच सळसळत असते. ही कामनावृत्ती शुद्ध ज्ञानाला झाकते आणि हा देहाभिमानी जीव या बाह्यवस्तूंमुळे मोहित होऊन साधनेपासून दूर होतो.