आनंद तरंग - दुरितांचे तिमिर जावो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:42 AM2019-04-01T07:42:56+5:302019-04-01T07:43:13+5:30
साने गुरुजींनी जेव्हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य बहुजनास प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तेव्हा गुरुजी पांडुरंगास उद्देशून म्हणाले होते.
प्रा. शिवाजीराव भुकेले
साने गुरुजींनी जेव्हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य बहुजनास प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तेव्हा गुरुजी पांडुरंगास उद्देशून म्हणाले होते. ‘‘विठ्ठला! गोऱ्या-गुबगुबीत मुलाला कुणीही जवळ घेईल आणि त्याला कुरवाळू लागेल, पण त्या मुलास जवळ घेण्याची गरज आहे, ज्याचे जगात कुणीच नाही, अन्नपाण्याविना जे तळमळत आहेत. तुझी ही सारी लेकरे अशीच आहेत. त्यांना प्रथम जवळ घेण्याचे काम कर. त्यांना तुझे खरे स्वरूप दर्शन दे आणि तू खरंच लेकुरवाळा आहेस हे तुझ्या कृतीने सिद्ध कर.’’ साने गुरुजींची ही हाक पांडुरंगाने ऐकली असावी. त्यामुळे तो समतावादी देवाधिदेव झाला. गुरुजींच्या या प्रार्थनेचे बीजांकुर संत ज्ञानदेवांच्या
दुरितांचे तिमिर जावों। विश्व स्वधर्म सूर्य पाहों।
जो-जे वांछील। तो ते लाहों प्राणीजात।
या पसायदानातील ओवीत प्रतिबिंबित झालेले दिसते. ज्ञानदेवांच्या कालखंडात सहस्रावधी स्त्री-पुरुष धर्म-कर्माच्या काल्पनिक बंधनांनी करकचून आवळले गेले होते. मनुष्य मनुष्याला उराउरी भेटू शकत नव्हता. तेथे जाती-धर्माबरोबरच ज्ञानी-अज्ञानीपणाची कुंपणे आडवी येत होती. देवत्वाची जाणीव व स्वस्वरूपाचे ज्ञान यापासून तळागाळातला माणूस शेकडो योजने दूर होता. आध्यात्मिक क्षेत्रात तर त्याच्यावर आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण एवढेच म्हणायची वेळ आली होती. ज्ञानेश्वरासारख्या बहिष्कृताने समाजातील नाहीरे वर्गाचे पारमार्थिक संघटन केले आणि ज्ञानापासून दुरावलेल्या मंडळींच्या जीवनात ज्ञानेच्छा निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य केले. वास्तविक पाहता ब्रह्म, माया, मोक्ष, मुक्तीच्या गप्पा मारल्याने ‘स्व’ला जाणून घेण्याचे ज्ञान होत नाही.