आनंद तरंग - माईची ममता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 03:27 AM2019-06-11T03:27:02+5:302019-06-11T03:27:31+5:30
किती छान आहे. सूर्व्यांची ही कविता. कोंबडीला दूध नसते ती उब देऊन बाळाला वाढवते.
बा. भो. शास्त्री
आई या शब्दावर खूप लिखाण झाले. जगभरातल्या हजारो कवींनी कविता लिहिल्या; पण आजही आई तेवढीच शिल्लक आहे. तो मायेचा सागर कधीच उपसला जाणार नाही व आटणारपण नाही. पक्षिणी पिल्लाच्या तोंडात चारा भरवते. गायीच्या पोटातून वासरू जन्म घेते. पोटातलीच घाण वासराला लागलेली असते. गाय ती घाण चाटून पुन्हा आपल्या पोटात घेते व वासराला स्वच्छ करते.
‘‘हांबरून वासराला चाटित जाय गाय
तेव्हा मला गायिमदी दिसली माझी माय’’
किती छान आहे. सूर्व्यांची ही कविता. कोंबडीला दूध नसते ती उब देऊन बाळाला वाढवते. मासोळी नेत्रातून कावी अंत:करणातून अमृतकळेचा संसार करते. अशा या प्राणी जगातल्या आईची दखल स्वामींनी लीळाचरित्रात घेतली आहे व मानवी मातेवर एक सूत्रच सांगितले आहे. ते असे, ‘‘बाई, तुम्ही माये की, मां मायेचा ठायी आणि एथ सळही सामाये की!’’ मायाबाई नावाची एक स्त्री वेरुळला स्वामींच्या भेटीस आली. ती म्हणाली, माझा नवरा वारला, एक मुलगी विधवा दुसरीला नवऱ्याने सोडलं तिला घुरं येतं. पैसा नाही. लोकांच्या नजरेतून मुलींना कसं वाचवू? मी द्वारकेला जाते. एक मुलगी पाठीशी एक पोटाशी बांधून समुद्रात उडी टाकते. तेव्हा वरचं सूत्र श्रीमुखातून अवतरले आहे. आत्महत्येपासून परावृत्त करणारं हे सूत्र. जीवन सुखमय करते हे वचन. अशांत जीवनाला शांत, त्रस्त झाला त्याला स्वस्थ करते. दिलासा देतं हे वचन. स्वामी म्हणतात, बाई तू फक्त बाई नाहीस. तुझ्यात माय आहे. माय मरत नसते व ती मुलींना मारतही नसते. आईच हृदय दु:ख सामावून घेणारी विस्तीर्ण जागा आहे. सर्व नद्या गडारासह सागरात येतात. तो सामावून घेतो. माय तू मायेचा सागर आहेस. तो सागर विचलित होत नसतो. माय आणि ईश्वर या दोनच शक्ती सामावून घेतात. आईत वात्सल्य व देव भक्तवत्सल आहे.