आनंद तरंग: माझे गुरू आत्मज्ञानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:29 AM2019-06-05T03:29:57+5:302019-06-05T03:30:14+5:30
म्हणून आत्मज्ञानी व्यक्ती कशी असावी हे तुम्ही ठरवू नका. कोण आत्मज्ञानी आहे आणि कोण नाही याची चिंता तर अजिबात करू नका. तुमच्या गुरूंनी तुम्हाला जो काही मार्ग दाखविला आहे तो तुम्हाला बंधनांत अडकवतो आहे की मुक्तीकडे नेतो आहे
सद्गुरु जग्गी वासुदेव
कोण आत्मज्ञानी आहे आणि कोण नाही याचा न्यायनिवाडा करण्यात तुमचा वेळ घालवू नका. तुम्ही आत्मज्ञानी होणे हे महत्त्वाचे आहे. तर तुमच्या गुरूंची काळजी करीत बसू नका; कारण तुम्ही जर त्यांची काळजी करीत बसलात, तर तुम्ही एकतर त्यांच्यावर विश्वास ठेवाल किंवा विश्वास ठेवणार नाही. जर त्यांच्यावर विश्वास ठेवलात, तर ते जणू ईश्वरच आहेत असा अंधविश्वास तुमच्यात निर्माण होईल आणि जर तुम्ही अविश्वास दाखवलात, तर तुमच्या मनात अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतील. यापैकी काहीजरी तुम्ही केलंत तरी तुमच्या गुरूंना अनुभवण्याची संधी तुम्ही गमवाल.
म्हणून आत्मज्ञानी व्यक्ती कशी असावी हे तुम्ही ठरवू नका. कोण आत्मज्ञानी आहे आणि कोण नाही याची चिंता तर अजिबात करू नका. तुमच्या गुरूंनी तुम्हाला जो काही मार्ग दाखविला आहे तो तुम्हाला बंधनांत अडकवतो आहे की मुक्तीकडे नेतो आहे, फक्त एवढे तपासून पाहा. जर तो तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जात असेल, तर तुमचे गुरू आत्मज्ञानी आहेत की नाहीत याने काहीही फरक पडणार नाही; ती तुमची समस्या नाही. तुम्हाला जे सांगितले गेले आहे ते यथायोग्य करा. एखादी व्यक्ती आत्मज्ञानी आहे की नाही याचा विचार करीत बसणे म्हणजे निव्वळ आपला वेळ, विचार आणि ऊर्जा वाया घालविण्यासारखे आहे. कारण त्यातून तुम्ही कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. जो काही निष्कर्ष काढाल त्यामुळे केवळ तुमच्या मनाचे समाधान होईल; परंतु सत्य काय आहे याचा उलगडा
होऊ शकणार नाही, कारण जे पैलू तुम्हाला माहीतच नाहीत ते जाणण्याचा तुमच्याजवळ कुठला मार्ग किंवा पर्यायच नाही.