आनंद तरंग - योगवासिष्ठातला राम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:27 AM2019-04-05T07:27:18+5:302019-04-05T07:27:39+5:30
शैलजा शेवडे जेव्हा विश्वामित्र यज्ञाचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाची मागणी करायला दशरथाकडे आले, तेव्हा रामाला सभास्थानी बोलाविण्यात आले. राम तिथे ...
शैलजा शेवडे
जेव्हा विश्वामित्र यज्ञाचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाची मागणी करायला दशरथाकडे आले, तेव्हा रामाला सभास्थानी बोलाविण्यात आले. राम तिथे आला. धैर्य, शांती, औदार्य, विनय इ. दैवी गुणांनी संपन्न असलेला तो तरुण वृद्धासारखा खिन्न दिसत होता. वसिष्ठ मुनींनी त्याचे कारण विचारले, तेव्हा सद्गुणी राजपुत्र म्हणाला,
‘पितृजन अन् मुनीवर तुम्हां, लक्ष लक्ष प्रणाम,
अती आदरे, तुम्हास पुसतो, सुखशांतीचे धाम ।१।
जन्म जाहला राजगृहा मम, पूज्य पित्याचे, छत्र मजवर,
तरीही माझ्या मनी विरक्ती, द्या आनंदपद निदान ।२।
सारे अस्थिर, मन हे विटले, क्षणिक भोगे सुख हो कुठले?
अज्ञानाने व्याकुळ हा जीव, कुठले नित्य स्थान? ।३।
दीपज्योतीवर बोट फिरावे, क्षणात मग ते काळे व्हावे, लक्ष्मीचा तो स्पर्श आणितो, अनर्थाचिच जणु खाण ।४।
दूराभिमान हा प्रबळ शत्रू जो, संसारी या दु:खच देतो,
दैवी संपत्ती शांती जाळीतो, जीवन करी वैराण ।५।
चंचल चित्त चिंता देते, पाप करविते, विष कालविते,
अधोगतीला मनुजा नेते, उडवी दाणादाण ।६।
तृष्णा आहे, अग्निज्वाला, भस्मसात करी सद्गुणाला,
ज्ञान, विग्रह, शौर्य विरक्ती, सारे जाळी तहान ।७।
कशासाठी मग यातायाती? क्षणभंगूर या देहासाठी?
दोषपूर्ण अन् रोगांचे घर, अतिप्रिय तरी हे धाम? ।८।
परिवर्तन हा नियम जगाचा, ध्यास शाश्वत ज्याचा,
जीवनमृत्यू, सारखेच मज, विषय विषसमान ।९।
तुम्हीच सांगा, मजला मुनीवर, जीवनपथ तो असा शुभंकर, संसारी या, कुणा स्मरावे,
कशात अन् कल्याण? ।१0।