आनंद तरंग - तस्य वाचक: प्रणव:
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 05:30 AM2019-06-13T05:30:29+5:302019-06-13T05:31:41+5:30
ॐ,प्रणव हे त्या परमेश्वराची ओळख आहे. परब्रह्माचे नाव आहे.
शैलजा शेवडे
ॐ,प्रणव हे त्या परमेश्वराची ओळख आहे. परब्रह्माचे नाव आहे. त्या सर्वव्यापी निश्चल, निर्मम अशा पूर्णब्रह्माने एक संकल्प केला, ‘एकोहरम, बहु स्याम'. तो संकल्प करायच्या आधी त्याने जो एक हुंकार केला, जो ध्वनी केला, तो ओंकार..ॐ. त्या ध्वनीच्या लहरी सगळीकडे पसरत गेल्या. त्यांनी सर्व काही व्यापून टाकले. ॐ कार. शब्द हरवतात, चित्त शून्य होते, तेव्हा ॐ कार ऐकू येतो. तो अस्तित्त्वाचा ध्वनी, अस्तित्वाची लय आहे. ते मनुष्याने दिलेलं नाव नाही. द्वैत संपल्यावरही एकच ध्वनी ऐकू येत राहतो. ॐ..जेव्हा कुणी समाधिस्थ होतो, तेव्हा ओंकाराचे गुंजन ऐकतो.
ब्रह्म असेल साध्य जर का, प्रणवाचे ते धनुष्य बनवा,
आत्म्याचा तो बाण चढवूनी, लक्ष्य सहज ते प्राप्त करा।
ओंकाराला अपुले करा, ब्रह्मलोक तो प्राप्त करा।
ओंकाराचा जप तो करा, ओंकाराचा जप तो करा।
ओंकार असे तो स्वर विश्वाचा, स्वर एकाक्षर ब्रह्माचा,
ओंकारच पर, अपर ब्रह्म अन, अंकुर ब्रह्मबीजाचा,
नाद अनाहत तो ओंकार, सर्व व्यापक तो ओंकार,
आनंदाला प्राप्त करा, ओंकाराचा जप तो करा।
विश्वनिर्मिती असे ज्यातूनी, परमात्म्याचे भान ओंकार,
चलायमान हे विश्वच सारे, चराचरी घुमतो ओंकार,
प्रथम ध्वनी तो ओंकार, आदि मध्य अंताच्या पार,
आत्मिक बल ते प्राप्त करा, ओंकाराचा जप तो करा। ओंकार सत्य आहे. आपले आंतरिक अस्तित्व आहे. ओंकाराच्या ध्वनीलहरी पृथ्वीपासून आकाशात दशदिशात प्रतिध्वनित होतात. ओंकार शिवत्त्वाचे प्रतीक आहे. ओंकारात तीनही देव सामावले आहेत. ‘अ’कार ब्रह्म, ‘उ’कार विष्णू आणि ‘म’कार महेश दर्शवतात. ओंकार ध्वनी सर्वात पवित्र आहे, दिव्य आहे. त्याच्याहून अधिक सुंदर काहीही नाही. ओंकाराचा अर्थ जाणून घेऊन त्याची साधना केली, तर आपले जीवनच बदलून जाते.