आनंद तरंग - योग म्हणजे मिलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 06:55 AM2018-12-19T06:55:35+5:302018-12-19T06:55:59+5:30
योगाचा अर्थ शरीर वेडवाकडे पिळणे नव्हे़ श्वास रोखून धरणे, डोके खाली, पाय वर किंवा असे काहीतरी करणे म्हणजे योग नव्हे
जग्गी वासूदेव
योगाचा अर्थ शरीर वेडवाकडे पिळणे नव्हे़ श्वास रोखून धरणे, डोके खाली, पाय वर किंवा असे काहीतरी करणे म्हणजे योग नव्हे. खरे पाहता, जगण्याची अवघी प्रक्रियाच जर तुम्ही जीवनाच्या सर्वोच्च संभावनेत बहरण्यासाठी वापरत असाल, आयुष्याचा प्रत्येक पैलू तुमच्या आंतरिक विकासाचे प्रगती पाऊल म्हणून उपयोग करत असाल, तर मग तुम्ही योगाच्या अवस्थेत आहात. अशा अवस्थेत पोचण्यासाठी अनेक पद्धती आणि साधना उपलब्ध आहेत, जेणेकरून तुमचे शरीर, तुमचे मन, सर्वकाही तुमच्या जीवनातील अडथळा नव्हे, तर एका संभावनेत परावर्तित करता येते.
तुम्ही जीवन कसे जगता, यालाच योग म्हणतात. ‘योग’ या शब्दाचा शब्दश: अर्थ आहे मिलन. तुम्ही तुमच्या ओळखीला चिकटून बसल्यामुळे तुम्ही विभक्त झालेले आहात. खरे पाहता, योग म्हणजे तुमची व्यक्तिगत ओळख मिळविणे आहे. ज्या प्रकारची कामे तुम्ही करत आहात, त्याच्याशी तुम्ही तुमची ओळख जोडत जात आहात आणि त्या प्रकारचा पूर्वाग्रह तुम्ही बनत आहात. हेच मनाचे स्वरूप आहे. एकदा जर का तुमची ओळख एखाद्या गोष्टीशी जोडली गेली की, तुमचे मन फक्त त्या ओळखीभोवतीच फिरत राहते. जर तुम्ही म्हणालात, ‘मी भारतीय आहे’, मग तुम्ही त्यानुसार विचार करता आणि अनुभवता. हो की नाही? ‘देश’ ही फक्त एक कल्पना आहे, पण ज्याक्षणी तुम्ही त्या कल्पनेसोबत तुमची ओळख जोडून घेता, मग तुमचा अवघा विचार, जीवन-अनुभव आणि समजण्याची पद्धत सर्वकाही त्यानुसार बदलते़ हे तुमच्या बाबतीत विविध पातळ्यांवर घडत असते.