आनंद तरंग : ॐ नम: शिवाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:05 AM2020-02-20T03:05:04+5:302020-02-20T03:05:33+5:30
शिव. निराकार परमात्मा! सर्वव्यापी परब्रह्म! तो सगुणही आहे
शिव. निराकार परमात्मा! सर्वव्यापी परब्रह्म! तो सगुणही आहे. जटाजूट धारी, त्रिनेत्रधारी, डोक्यावर चंद्रमा, हातात त्रिशूल, नीलकंठ पार्वतीपती. त्याला लयकर्ता म्हणतात. तो महारुद्र आहे. कोपिष्ट आहे, पण भक्तांसाठी अत्यंत प्रेमळ. आशुतोष आहे. लगेच प्रसन्न होणारा, पावणारा आहे. तो गुरू आहे, तो मार्गबंधू आहे. जीवनाच्या सुपथावर साथसंगत करणारा आहे. तुम्ही त्याला प्रेमाने भक्तीने हाक मारा, तो नक्की धावून येतोच. म्हणजे सतत आपल्या अवतीभवती असतोच. आपल्याला त्याचे अस्तित्व, आश्वासकता जाणवते. शिव म्हणजे कल्याणकारी. शुभंकर. तो आपल्याबरोबर आहेच. तो निळकंठ आहे. स्वत: हलाहल प्राशन करून त्याने इतरांचे प्राण वाचविले.
असे तो तुझ्या, नेहमी संगती रे,
महादेव शंभू अपर्णापती,
नसे एकला तू, कधीही प्रवासी,
असे सोबती तो उमेचा पती.
कधी कोवळेसे रवी बिंब भासे,
कधी तप्त आभेमध्ये तो विलासे,
विरुपाक्ष ज्योतिर्मयी शांतरूपी,
कधी रुद्र विक्राळ त्याचीच मूर्ती।
वसंतातली पालवी हास्य त्याचे,
त्रिलोकेश त्या सर्वलोकेश्वराचे,
नभातून तो मेघ वर्षाव वाटे,
कृपावंत देणे जटाशंकराचे।
कधी थंड वारे, तसा गारवाही,
पहा त्यात कैलासनाथास तू ही,
हिवाळ्यातली तीच नि:ष्पर्ण सृष्टी,
अपर्णापतीची असे तीही दृष्टी।
यमाच्या भया त्या धरीसी कशाला,
स्मरावे सदा नित्य मृत्युंजयाला,
महाकाल ईशान गंगाधराला, महादेव, देवेश, सर्वेश्वराला।