आनंद तरंग - अर्जुनविषादयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 03:34 AM2019-12-26T03:34:19+5:302019-12-26T03:34:41+5:30

महाभारत युद्धासाठी समोर उभ्या ठाकलेल्या आपल्याच

Anand wave - Arjunwishedeoge mahabharat | आनंद तरंग - अर्जुनविषादयोग

आनंद तरंग - अर्जुनविषादयोग

Next

शैलजा शेवडे

समोर असता, गुरुजन माझे, आप्त इष्ट भाऊ,
सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?
कंप सुटे हा, माझ्या शरीरा, भ्रमित मन होई,
गांडीव धनु हे, हातामधुनी, बघ गळून जाई,
सारी चिन्हे, विपरीत दिसती, दाह कसा शमवू,
सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?
ज्यांच्यासाठी वान्छितसे हे, राज्य भोग नि सुखे,
तेच स्वजन रे, सिद्ध होऊनी, लढण्या समोर उभे,
त्यांना मारून त्रैलोक्य नको मज, काय मही घेऊ?
सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?
गुरुजन, आणिक वडीलमंडळी, इतरही आप्त इथे,
दुष्ट कौरवा, मारून आम्हा, सुख असे कोणते,
स्वजना मारून, पापांचेच धनी आम्ही होऊ,
सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?
कुलक्षय होईल, अधर्म येईल, महत्पाप हे करणे,
श्रेयस्कर ते प्रतिकाराविण, माझे रणी मरणे,
नको नको हे युद्ध माधवा, रथ पुढे नेऊ,
सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ,

महाभारत युद्धासाठी समोर उभ्या ठाकलेल्या आपल्याच आप्तस्वकीयांना बघून अर्जुन भांबावून गेला. अर्जुन अत्यंत पराक्रमी योद्धा. पण तरीही संवेदनाशील. क्षात्रधर्म एकीकडे लढ म्हणून खुणावतोय. अन्याय निपटून काढण्यासाठी, दुर्जनांना मारण्यासाठी युद्धासाठी तयार आहे. त्याचवेळी समोर शत्रुपक्षात आपल्याच लोकांना बघून बावरून गेलाय. हे युद्ध करून काय सुख मिळविणार आपण? असा संदेह त्याच्या मनात आलाय. त्याने आपले गांडीव धनुष्य खाली ठेवलंय आणि आपल्या सख्याला, सारथ्याला, कृष्णाला आपल्या मनातली खळबळ सांगतोय. सर्वसामान्य माणसालासुद्धा अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. धर्मात सांगितल्याप्रमाणे आपण सत्य बोलतो. तरीही मोठाच प्रश्न पडतो. म्हणूनच भगवद्गीतेचा अभ्यास अत्यंत उपयोगी पडतो.
 

Web Title: Anand wave - Arjunwishedeoge mahabharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.