आनंद तरंग - विषयांचे कुरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 01:12 AM2019-10-28T01:12:51+5:302019-10-28T01:13:10+5:30

इंद्रियांना जेव्हा विषय सेवनाचे वळणच पडून जाते, तेव्हा संबंधित विषयाची पूर्तता झाली तर आनंद निर्माण होतो

Anand wave - a pasture of subjects | आनंद तरंग - विषयांचे कुरण

आनंद तरंग - विषयांचे कुरण

Next

प्रा. शिवाजीराव भुकेले

रिमझिम बरसणाऱ्या सरीने धरणीमातेवर हिरवीगार शाल पांघरावी, लवलवत्या तृण पात्यांनी आपल्या रसिल्या रूपात साºया पशू-पक्ष्यांना आणि माणसाससुद्धा साद घालावी; पण एखाद्या मालकाने तरण्याबांड ‘खोंडास’ हिरव्या कुरणाजवळच खुंटाला बांधावे; पण भुकेचा आगडोंब उसळू लागला अन् हिरव्यागार गालिचाचे ‘कुरण’ खुणावू लागले की, ‘खोंड’ खुंट्यासहित आणि ‘दाव्या’सहित उसळी घेऊन हिरव्या कुरणावर ताव मारते. आता यात दोष त्या ‘खोंडाचा’ की त्याच्या मालकाचा, हा प्रश्न अलहिदा; पण आज अध्यात्माच्या नावाखाली विषय दमनाच्या ‘खुंट्याला’ सर्वसामान्यास बांधणाºया अनेक महागुरूंची अवस्था त्या मालकासारखी आणि शिष्यांच्या भाऊगर्दीची अवस्था तरण्याबांड खोंडासारखी झाली आहे. एकेकाळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयांवर साधक जाता-जाता विजय मिळवायचा; कारण त्याच्याभोवती विषयरूपी हिरवेगार कुरण खूपच कमी प्रमाणात असायचे; पण आज मात्र सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सुरा, सुंदरी यांची हिरवीगार कुरणे साधक आणि सिद्ध म्हणवून घेणाºया मंडळींच्या भोवतीने नंगानाच घालीत आहेत. यामुळे गुरूच विषय विकारात गुरफटले जात आहेत. त्यावर बाजी मारण्याचे काम शिष्य करीत आहेत. या विषयाकडे धाव घेण्यापूर्वी ती मनातच येऊ नयेत, अशी प्रार्थना करताना विश्वज्योती महात्मा बसवेश्वर म्हणाले होते -
विषयरूपी हिरवेगार कुरण, आणुनी माझ्यापुढे
पशूला काय कळते, ते तर हिरवळीकडे ओढ घेणारच
विषयरहित करूनि, भक्ती रस आकंठ पाजुनी
कृपादृष्टीने पहा हे कुडलसंगम देवा ॥
संयमाचे बांध सैल झाले की, इंद्रियांना पंचविषय प्राणापेक्षाही प्राणप्रिय वाटू लागतात, असे म्हणतात. कावीळ झालेल्या माणसाला सारे जगच पिवळे दिसायला लागते, तसे विषयभक्त परायणमंडळींना सारे जगच विषयासक्त वाटायला लागते. स्वार्थ, संपत्ती, सौंदर्य व सत्तेच्या विषयाची धुंदी चढली की, आपल्या पलीकडचे सारे जगच धूसर वाटायला लागते. इंद्रियांना जेव्हा विषय सेवनाचे वळणच पडून जाते, तेव्हा संबंधित विषयाची पूर्तता झाली तर आनंद निर्माण होतो अन् पूर्तता नाही झाली तर निर्माण होणारा विवाद आपल्याला नाही तर कुणालाच नाही, या भावनेने सभोवतालच्या वातावरणाला अशांततेची चूड लावतो. मानवास शाश्वत सुख देणे हा मुळात विषयाचा धर्मच नाही. जसे रोहिणी नक्षत्रात डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी निर्माण झालेले मृगजळ पाहून ‘मृगास’ वाटते, या ‘मृगजळा’च्या गंगेत पाणी पिल्यावर आपली तहान निश्चित भागेल. म्हणून ते सैरावैरा धावू लागते व धावून-धावून ऊर फुटून मरून जाते. अगदी तसेच विषयाच्या मृगजळापाठीमागे धावून सुख मिळेल म्हणून विषयी माणसे रात्रंदिवस त्या पाठीमागे धावत राहतात आणि अपूर्णतेच्या शापातच मरून जातात. सुख आणि विषय यांचा तसा अर्थाअर्थी कुठेही संबंध नाही. नव्हे, विषयामुळे साधा सुखाचा भाससुद्धा निर्माण होत नाही. कारण परमसत्याचा शोध घेण्यासाठी केला जाणारा विचार हाच शाश्वत सुखाचा राजमार्ग आहे. जर तिथंपर्यंत आपणास पोहोचता येत नसेल, तर विषय सुखाचा कौटुंबिक मर्यादेत उपयोग घेऊन हळूहळू त्या परम सत्याच्या जवळपास तरी पोहोचण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खºया अर्थाने पारमार्थिक होणे होय; परंतु परमार्थाच्या नावाखाली आज प्रापंचिक माणसास ‘हीन’ ठरवून भोगासाठी भजने करणारी आणि संतसंगाचे महामेळावे घेणारी मंडळीच परमार्थाच्या क्षेत्रात विषयाचा धागडधिंंगा घालीत आहेत.

Web Title: Anand wave - a pasture of subjects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.