आनंद तरंग: कर्माचे बीजारोपण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 06:28 AM2020-01-18T06:28:20+5:302020-01-18T06:28:35+5:30
आपले सुसंस्कारी जीवन नवीन संस्कृतीला जन्म देऊ शकेल. देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या सर्वांच्या हातात आहे.
नीता ब्रह्मकुमारी
शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी विदेशात गेलेला भारतीय युवावर्ग तेथील स्वच्छंद जीवन पद्धतीच्या आहारी जात आहे. पैशाच्या मोबदल्यात भारतीय संस्कृती पणाला लावत आहे. स्वत:चे संस्कारी जीवनसुद्धा गहाण ठेवत आहे. एके काळची म्हण होती की, ‘धन गेले तर काही गेले नाही, तन गेले तर थोडे काही गेले, पण चरित्र गेले तर सर्व काही गेले.’ आज हीच म्हण उलटी झाली आहे. चरित्र गेले तर काही हरकत नाही, तन गेले तर थोडेसे नुकसान झाले, पण धन गेले तर सर्वस्व गेले. आज कोणी कितीही धनाढ्य असला तरी त्यांच्याकडे गुणांची, चांगल्या संस्कारांची गरिबी दिसून येते. भारत संतांची, महात्म्यांची अनेक योगींची जन्मभूमी आहे. त्यांच्या पवित्र जीवनाचा सन्मान करून आपण ही प्राचीन संस्कृती जपण्याचा पूर्ण प्रयत्न करू या. यासाठी आपण स्वत: सुसंस्कारी बनण्यास प्रयत्नशील राहू या. कारण आज प्रत्येक मनुष्यात कोणत्या ना कोणत्या वाईट सवयी आहेत. कदाचित याच सवयी ज्यांना संस्कार म्हटले जाते, यामुळेच आपण दु:खी आहोत. सूक्ष्म आणि स्थूल सवयींना बदलण्यासाठी प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवायला हवे. कारण या कर्मांची शृंखला संस्कारांना जन्म देते आणि हेच शक्तिशाली संस्कार आपल्याकडून वारंवार तेच कर्म करून घेतात. कर्म आणि संस्कार यात एक सूक्ष्म धागा आहे. जर त्याला जाणीवपूर्वक, युक्तीने तोडण्याचे सामर्थ्य आपल्यात आले तर पूर्ण जीवनच बदलून जाईल. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. पण मनुष्य जीवन त्याच्या कुटुंबाला, समाजाला तसेच देशाला घडवते. आपले सुसंस्कारी जीवन नवीन संस्कृतीला जन्म देऊ शकेल. देशाचे उज्ज्वल भविष्य आपल्या सर्वांच्या हातात आहे. चला तर मग, आपल्या श्रेष्ठ कर्मांचे बीजारोपण करून सुंदर संस्कारांनी नवीन संस्कृतीची बाग फुलवू या. या बागेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुणांचा सुवास, उत्साहाचा झोपाळा, प्रेमाची सावली लाभेल जेणेकरून त्याचे जीवनही सुगंधी बनेल.