आनंद तरंग: माणूस घडवणारा धर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:40 PM2020-05-04T23:40:07+5:302020-05-04T23:40:25+5:30
व्यक्तिगत जीवन चिमण्या- कावळेही जगतात; पण व्यक्तिगत जीवन जगून ते दुसऱ्याच्या परोपकारार्थ झिजविता आले पाहिजे.
मोहनबुवा रामदासी
राष्ट्रनिर्मिती ही केवळ पाच- १0 वर्षांसाठी नसते, तर माणसातला माणूसधर्म जागवणारा आणि जगणारा माणूसही धर्मस्थापना करीत असतो.
समर्थ म्हणतात :
धर्मसंस्थापनेचे नर। ते ईश्वराचे अवतार।
झाले बहू पुढे होणार। देणे ईश्वराचे।।
राष्ट्रधर्म ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ती दीर्घ काळापासून चालत आलेली आहे. आजपर्यंत अनेक साधू, संत, क्र ांतिकारक, स्वातंत्र्यवीरांनी ही धर्मसंस्थापना केली व ती दीर्घकाळ सांभाळली. यातील दोन महान राष्ट्रपुरुष व राष्ट्रसंत या भारतमातेच्या कुशीत जन्मले आहेत. यातील एक योद्धा संन्यासी श्री समर्थ रामदास स्वामी आणि एक संन्यस्त योद्धा स्वामी विवेकानंद. हे श्री समर्थ आणि स्वामी विवेकानंद या भारतमातेच्या पोटी जन्माला आले आणि या राष्ट्रसंतांनी माणसातला माणूसधर्म माणसाला शिकवला. त्याला हा माणूसधर्म जगण्याचा मार्ग दाखविला. प्रयत्नवाद हे दोघांचेही व्रत होते! कोणतेही राष्ट्र उभे करायचे असेल, प्रगत व्हायचे असेल तर सामान्य माणूस घडवला गेला पाहिजे. समर्थांनी धर्माची व्याख्या फार सुंदर केली आहे. ते म्हणाले :
सकळ धर्मामधे धर्म। स्वरूपी रहाणे हा स्वधर्म। परोपकारार्थ देह झिजविला पाहिजे. झिजण्यावाचून कीर्ती कैची। मना चंदनाचे परी त्वा झिजावे। परी अंतरी सज्जना निववावे।
व्यक्तिगत जीवन चिमण्या- कावळेही जगतात; पण व्यक्तिगत जीवन जगून ते दुसऱ्याच्या परोपकारार्थ झिजविता आले पाहिजे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद या भूतलावर निर्माण झाले आणि समाजातील मरगळ दूर सारून देव, देश आणि धर्माची शिकवण त्यांनी समाजाला दिली. मन आणि मनगट सशक्त असेल, तर आपल्यावर चालून आलेली शक्ती निर्बल पाहायला मिळेल. म्हणून धर्माधिष्ठित राज्य हेच खरे रामराज्य असेल!