आनंद तरंग: भयाची पत्रके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:37 AM2019-06-07T03:37:30+5:302019-06-07T03:37:45+5:30
विज्ञानयुगात असली आंधळ्या भयाची पाळंमुळं सर्वत्र खोलवर शिरलेली आढळतात. अजूनही देवभयापासून समाज मुक्त नाही. त्यामुळेच मानसिक ऊर्जेचा प्रवाह हा अनिष्ट प्रथेत वाया जाताना दिसतो.
विजयराज बोधनकर
एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये पांप्लेट नावाचा लघुचित्रपट पाहिला. अंधश्रद्धेवर आधारित होता. एका छोट्याशा शाळकरी मुलाच्या हाती एक थोराड व्यक्ती एक पत्रक देतो आणि निघून जातो. त्या पत्रकावर मजकूर असा असतो की, हे पत्रक अमूक अमूक देवाचे आहे. या पत्रकाच्या शंभर कॉपी काढून लोकांमध्ये वाटल्यात तर तुमचे संकट दूर होईल, न होणारी कामे होतील आणि घरात सुख नांदेल, परंतु शंभर पत्रके न वाटल्यास वाईट घटना, संकटे, आप्तांचा मृत्यू येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. हे वाचून तो शाळकरी मुलगा अर्धमेला होऊन जातो. त्याच्याकडे पैसे नसतात. त्याचे वडील देव देवस्की मानणारे नसतात. त्या मुलाची घुसमट आणि आताचा समाज याचं उत्तम चित्रण त्या चित्रपटात केलं आहे. शेवटी तो मुलगा ते पत्रक एका आंधळ्या म्हाताऱ्याच्या हाती देऊन त्या वचनातून मुक्त होतो़ या विज्ञानयुगात असली आंधळ्या भयाची पाळंमुळं सर्वत्र खोलवर शिरलेली आढळतात. अजूनही देवभयापासून समाज मुक्त नाही. त्यामुळेच मानसिक ऊर्जेचा प्रवाह हा अनिष्ट प्रथेत वाया जाताना दिसतो. ग्रामीण भागात आजही आणि कालही बुद्धिवान युवावर्ग होता आणि आहे. परंतु भोळसट मार्गात अडकलेली पाऊले त्यांनी शैक्षणिक आणि कल्पक मार्गाकडे वळवली तर अशा भोंदूगिरी करणाऱ्यांचा आपोआपच नायनाट होईल. शहरी भागातही अशा पद्धतीचं भय आहे. परंतु त्याचं प्रमाण तितकंसं नाही. देव कधीही कुणावर संकटं लादत नसतो. ईश्वरावरची श्रद्धा म्हणजेच कर्मावरची श्रद्धा असते. ज्याने निकोप आणि सुदृढ आयुष्य माणसाच्या आयुष्यात प्रवेश करीत असतं. म्हणूनच गाडगेबाबांनी शिक्षणाला देवत्वाचं प्रमाणपत्र दिलं आहे.