आनंद तरंग: परशुराम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 04:20 AM2019-05-03T04:20:26+5:302019-05-03T04:20:47+5:30
विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांनी अक्षय्यतृतीयेला अवतार घेतला
शैलजा शेवडे
विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांनी अक्षय्यतृतीयेला अवतार घेतला. रेणुकेच्या पोटी परशुराम, म्हणजेच भार्गवरामांनी याच दिवशी जन्म घेतला. म्हणून अक्षय्यतृतीयेच्याच दिवशी परशुराम जयंती.
यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ।
परशुरामाच्या जन्माच्या वेळीही अशीच स्थिती होती. ज्यांनी प्रजेचं संरक्षण करायचं, तेच प्रजेची लयलूट करत होते. अनाचार माजला होता. त्यामुळे भगवंताने वैशाख शुद्ध तृतीयेला जमदग्नी आणि रेणुकेच्या पोटी अवतार घेतला. तेच हे परशुराम. त्यांनी शिवाची आराधना करून शांकरविद्या मिळवली. महागणपतीकडून परशुविद्या मिळवली. अन्यायी, जुलमी राजांविरोधात २१ वेळा मोहिमा केल्या. त्यांना नेस्तनाबूत केले आणि शांतता निर्माण केली. त्यांचा जन्म गोरज मुहूर्तावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी झाला. म्हणून गोरज मुहूर्तावर त्यांची पूजा केली जाते. परशुराम चिरंजीव आहेत. म्हणून अक्षय्यतृतीयेला ‘चिरंजीवी तिथ’ असेही म्हणतात. परशुरामाच्या अवताराचं प्रयोजन सांगताना परमसद्गुरू गजानन महाराज म्हणतात,
कोणी न उरला शास्ता, महत्संकट पातले,
लुटावे, कोणी मारावे, ऐसे सर्वत्र जाहले ॥
अन्याये सांडिली सीमा, धाके विश्व थरारले,
जयांनी राज्य राखावे, घोर कर्मा प्रवर्तले ॥
ऐसा समय पाहूनी, जन्मला अंश विष्णुचा,
पवित्र भृगुच्या वंशी, सुपुत्र जमदग्नीचा ॥
परशुरामांनी परमशिवांकडून शांकरविद्या मिळवली. तपाचरण करून गणेशालाही प्रसन्न करून घेतले. त्यांना महागणपतीकडून परशुविद्या मिळाली म्हणून त्यांना परशुराम म्हणतात.