शरीरशास्त्र सांगते...झोप म्हणजे स्नायू शिथिलीकरण प्रक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:39 PM2018-12-22T18:39:07+5:302018-12-22T18:43:56+5:30
गुन्हेगारांकडून गुन्हयाची माहिती काढण्यासाठी पोलीस त्याला झोप मिळू देत नाही. त्यामुळे तो शरीर व मनाने दुर्बल होऊन शरणागती पत्करतो.
- डॉ. दत्ता कोहिनकर -
झोपायची वेळ - रेडियोवर एक गाणं लागलं होतं. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई .. का गं माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, मला केतनची आठवण झाली.
केतनला झोपच व्यवस्थित येत नव्हती म्हणून खुप नैराश्य आले होते. रात्रभर तो काळजी करत व्याकुळ व्हायचा. त्यामुळे त्याच्या जीवनावर या गोष्टीचा खुप गंभीर परिणाम झाला होता. मी त्याला म्हणालो, केतन ही परिस्थिती बदलण्यासाठी तू बिछान्यात पडल्यावर झोप आली नाही तरी काळजी करायची नाही. नुसते डोळे मिटून शरीर सैल सोडून सर्व चिंता व काळजी - नकारात्मकता मी सोडून देत आहे, असे वारंवार म्हणायचे व श्वास जाणून घेत पडून राहायचे. एकाच आठवडयात केतनला गाढ झोप यायला लागली. निद्रानाशापेक्षा त्यावर करत असलेली चिंता तणावग्रस्त करते व झोप गायब होते. डॉ. नॅथॅनिएल कलेटमन हे शिकागो विद्यापीठातील प्रोफेसर होते. त्यांनी झोप या विषयावर सर्वोच्च संशोधन केले. ते म्हणतात, निद्रानाशापेक्षा त्यावरच्या काळजीचे विचारच माणसाला दुर्बल करतात. छान झोप लागण्यासाठी सकारात्मक विचार अंतर्मनाला वारंवार द्या, श्रमाची कामे, व्यायाम, खेळ याद्वारे शरीराला दमवा.
झोपेमुळे प्रत्येक अवयवांना विश्रांती मिळते. शरीरशास्त्र सांगते झोप ही एक प्रकारची स्नायू शिथिलीकरण प्रक्रिया आहे. कष्टकरी मनुष्य लगेच झोपतो. पण विचारवंत वकील, प्राध्यापक, नेते हे मनाला लगेच विरक्त करू शकत नाहीत. गुन्हेगारांकडून गुन्हयाची माहिती काढण्यासाठी त्याला झोप मिळू देत नाही. त्यामुळे तो शरीर व मनाने दुर्बल होऊन शरणागती पत्करतो.
महर्षी चरक म्हणतात सुख - दु:ख व अशक्तपणा, जीवन व मृत्यू या सगळयांचा आधार झोप आहे. पोट मोकळे असताना भुजंगासनाची 8/10 सेकंदाची आवर्तने केल्यास व दीर्घ श्वसन केल्यास छान झोप लागते.
चांगली झोप येण्यासाठी उशीरापर्यंत टी.व्ही. पाहणे, रात्री व्हॉटस्अॅप व फेसबुकवर उशिरापर्यंत चॅटींग करत बसणे हे बंद करा. रात्रीचे जेवण लवकर करा. रूक्ष किंवा निरस पुस्तकांचे वाचन करताना मेंदूत हलका क्षीण येतो. त्यामुळे झोप येते. झोपताना पाणी पिऊ नका त्यामुळे लघवीसाठी मध्येच जाग येते. झोपण्यापूर्वी चहा, कॉफी घेऊ नका, त्यामुळे मेंदू उत्तेजित होतो. रात्री कोमट पाण्याने स्नान केले तरी झोप येण्यास मदत होते.
दुपारी 10 ते 15 मिनिटे वामकुक्षी घ्या. विन्सटन चर्चिल व रॉक फेलर ही दोन माणसे दुपारची वामकुक्षी कधीच चुकवीत नव्हते. युध्द काळात विमाने डोक्यावर घिरटया घालताना पण चर्चिलने हक्काची डुलकी चुकवली नाही. रॉक फेलर हा तर 97 वर्षे जगला.
डोक्याला तेलमसाज केल्यानंतर मोनोटोनीजमुळे झोप येऊ लागते. दुधामध्ये एक चमचा मध टाकून पिल्यास शांत झोप येते. समाधानी कामजीवन हा आनंदाचा व गाढ झोपेचा राजमार्ग आहे. त्याकडे लक्ष असू द्या. त्याकडे हिंसक मालिका, बातम्या रात्री पाहू नका. शक्यतो डाव्या कुशीवर व पूर्व-पश्चिम झोपण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा सुर्यास्तानंतर निसर्ग पण निद्रेच्या आहारी जातो. पाखरे घरटयात जातात, जनावरे गोठयात शिरतात, माणूस मात्र मोकाटच असतो. म्हणून सुर्याप्रमाणे माणसांनाही उगवता व मावळता आले पाहिजे. अशा पध्दतीने सकारात्मक विचारांनी निद्रानाश दूर करून निद्रा सुखाचा सुंदर अनुभव घ्या व वरील सर्व उपायांनी ज्यांचा निद्रानाश दूर होत नाही त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.