क्रोध : नरकाचा दुसरा दरवाजा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 07:40 AM2020-04-24T07:40:36+5:302020-04-24T07:41:11+5:30
अग्नीत पाणी नसतं, तसं क्रोधात दया, करुणा नसते. तो नरकाचा दुसरा दरवाजाच आहे. क्रोध दोषरूप आहे; पण गुणरूप होतच नाही का?
- बा. भो. शास्त्री
‘काम : क्रोध : लोभ इये तीनि नरकद्वारे’
काम हा क्रोधाचा बाप आहे. आवडीच्या कामात जेव्हा व्यत्यय येतो, तेव्हा क्रोध हजर होतो अन् माणूस क्रोधाचा गुलाम होतो. पश्चाताप झाल्यावर मी रागाच्या भरात बोललो असं आपण कबूल करतो व क्षमा मागतो. ज्या तोंडाने बोललो ते तोंड आपलंच असतं; पण भाव क्रोधाचा असतो. आपल्याच घरात भाडेकरूने घराचा रंग बदलावा, तसे विकार आपापला रंग देऊन जातात व काहीकाळ आपलाही स्वभाव बदलत असतो. ‘पहिले तुम्ही असे नव्हता, आता लहानसहान गोष्टींवर चिडचिड करता,’ असं लोकं म्हणतात. हे बदलणारे रंग असतात.
विकार नेहमीच आपलं शरीर वापरत असतात. क्रोध हा धगधगता विकार आहे. आपण गाडीचा चालक बदलतो, तेव्हा गाडीचा वापरही बदलत असतो व चालकापुढे मालक मजबूर होतो. असंच होतं आपल्या जीवनगाडीचं; पण काम इंद्रायार्थजन्य आहे. क्रोध हे कामाचं अपत्य आहे; पण तो कामासारखा सुंदर नाही. क्रूर चेहरा सुंदर कसा असेल, त्याच्या सहवासात आपलाही चेहरा बिघडतो. कोमल पण कठोर, प्रसन्न पण उदास, हास्य मावळतं, क्रौर्य झळकतं. क्रोध सौंदर्याचा शत्रू आहे. अजिंठा वेरुळचं सुंदर शिल्प क्रोधानेच विद्रुप केलं. नालंदा विद्यापीठातले ग्रंथ यानेच जाळले. हा स्वत: आणि दुसऱ्यालाही जाळतो.
हे नरकाचंदार भेसूर असतं. जणू सापाचं उघडं तोंडच. त्याच्याजवळ गेलं तरी दु:खाची आच लागते. ती ज्याला लागली तो होरपळतो. क्रोध संहारक आहे. त्याने दुर्वासाला कोपिष्ट व ज्ञानाला गर्विष्ठ केलं. त्याच्या संगतीने खूप शत्रू होतात. क्रोध घराला, मित्रांना, कुणालाच आवडत नाही. तो कुणाचंच स्वामित्व स्वीकारत नाही. जेवढा अडथळा मोठा, तेवढा तो आक्रमक होतो. क्रोध आत्मघातकी व परघातकी आहे. अग्नीत पाणी नसतं, तसं क्रोधात दया, करुणा नसते. तो नरकाचा दुसरा दरवाजाच आहे. क्रोध दोषरूप आहे; पण गुणरूप होतच नाही का?