जीवनविद्या : वसा संतकार्याचा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:38 PM2020-01-31T18:38:00+5:302020-01-31T18:38:06+5:30
पसायदानातून जगाच्या सुखासाठी भव्य व दिव्य प्रार्थना जन्माला आली.
अवघाची संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिन्ही लोक॥
या संताच्या महान कार्याचा झेंडा सदगुरू श्री वामनराव पै यांनी खांद्यावर घेतला व "हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थांने समृद्ध व्हावे व पुढे जावे" या संकल्पपुर्ती साठी जीवनविद्या मिशन या संस्थेच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांच्या मनांत हा संकल्प रूजविला.
सर्वे सुखिन् सन्तु, सर्वे सन्तु निरामय:
या भगवंताचा विचार
सर्व सुखी, सर्व भूती, संपुर्ण होईजे या दिव्य संकल्पातून मानवी मनात परिवर्तनाचे बीजारोपण करण्यासाठी या विश्वात्मक देवाकडे आर्त मागणी केली.
आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे॥
तोषूनी मज द्यावे। पसायदान हे॥
या पसायदानातून जगाच्या सुखासाठी भव्य व दिव्य प्रार्थना जन्माला आली.
याच पसायदानाचे मनात सतत स्मरण राहावे व मानवी जीवन सुख, शांती व समृद्धीने भरून जावे, याच सदभावनेतून
"हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
या विश्वशांतीसाठी निर्माण झालेल्या विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थनेतून मानवी मनामनांत सदगुरूंनी आनंदी व विधायक विचारांची बीजे बिंबवली व रूजविली.
वेद उपनिषदांतील शुध्द ज्ञान भगवंताच्या भगवत् गीता या महान तत्वज्ञानाने जगात अवतिर्ण झाली. हे दिव्य ज्ञान सर्व सामान्य मराठी जनतेला ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ रूपाने प्राकृतमध्ये दिले. हेच दिव्य असे ईश्वरी ज्ञान सर्व संतानी अभंगाच्या रूपाने साध्या सोप्या मराठी भाषेतून समाजापर्यंत पोहचविले.
आज संगणकीय युगात या पाकृत ओव्या व पद्यातल्या अभंगातील गुढ व गुह्य आजच्या युगाला विशेषत: तरूणाईला कळावे, या तीव्र तळमळीने सदगुरू श्री वामनराव पै यांनी किर्तन व प्रवचनांतून संतांच्या वचनातील गुह्य साध्या सोप्या मराठमोळ्या भाषेत समाजापर्यंत पोहचवू लागले. लोकांना ती आवडू लागली. हे तत्वज्ञान मोठ्याप्रमाणात लोकांपर्यंत पोहचावे म्हणून लोकाग्रहास्तव त्यांनी ग्रंथ लेखन सुरू केले.
त्यातूनच ज्ञानेश्वरीचे सार असणारे महान ज्ञानामृत व नामामृत सर्वसामान्य जनताजनार्दनापर्यंत पोहचून मानवाचा उध्दार व्हावा, या शुध्द व पवित्र हेतूने अगाध ज्ञान देणारा ज्ञानेशांचा संदेश व नामाचा महिमा व सामर्थ्य मुक्त कंठाने गाणारा नामाचा नंदादीप हे ग्रंथ सदगुरू श्री वामनराव पै यांनी जनताजनार्दनाला समर्पित केले.
महान तत्वज्ञानांचा, महान संदेशांचा, महान संस्कृतीचा व अमृत विचारधनांचा हा समृद्ध, शाश्वत, कल्याणकारी दिव्य संतवारसा सदगुरू श्री वामनराव पै यांनी अंगिकारला व संतकार्याचा पाईक होऊन त्यांनी स्वत:चा देह चंदनासारखा झिजवून किर्तन, प्रवचन, व्याख्याने व ग्रंथरूपाने जगाला शांती सुखाचा राजमार्ग दिला.
-संतोष तोत्रे