मानवतेच्या शिकवणीचा ध्यास घेतला पाहिजे. तीच खरी शिकवण ठरेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 07:47 AM2019-09-16T07:47:40+5:302019-09-16T07:48:08+5:30
जवळ-जवळ सर्व माणसे कोणत्या तरी पूर्वग्रही गटाचे सदस्यत्व पत्करून आयुष्य जगतात. त्या वेगवेगळ्या गटांच्या मूळ सिद्धांतात विलक्षण फरक आढळतो.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
मानवतेशी एकनिष्ठ राहण्याची संस्कृती प्रबळ झाली पाहिजे. मानवाने धर्मा-धर्मामधील तेढ कमी केला पाहिजे. बालकामध्ये किंवा शालेय जीवनात याची जाणीव करून दिली जावी. मानवतेचे मार्गदर्शन करणारे शिक्षण मिळावे. एकमेकांच्या संस्कृतीबद्दल जिज्ञासा ठेवल्यास मानवजात एकतेच्या शिखराकडे वाटचाल करेल. तेव्हा जो प्रमुख देव म्हणजे परमात्मा त्याचे स्पष्ट रूप लक्षात येईल. साध्याभोळ्या लोकांच्या मनातला भेदभाव निटावा. विज्ञानाच्या वेगवेगळ्या मर्यादित क्षेत्रांमध्ये बेजबाबदार मानवाने विनाकारण खटपट करू नये. त्याचे फळ एका भयंकर आत्मघातकी शक्तीच्या रूपाने प्रकट होते. त्या समस्या आपल्याला भेडसावत असतात.
जवळ-जवळ सर्व माणसे कोणत्या तरी पूर्वग्रही गटाचे सदस्यत्व पत्करून आयुष्य जगतात. त्या वेगवेगळ्या गटांच्या मूळ सिद्धांतात विलक्षण फरक आढळतो. आपसांतल्या भांडणात बुद्धी-शक्ती आणि इतर साधनसामग्री व्यर्थ घालवल्यामुळे आम्ही सर्व आता समस्याग्रस्त आहोत. प्रत्येक गटाचे पुढारी- स्वत:ला विद्वान समजतात. विद्वान संत, शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी लिहून ठेवलेल्या सर्व चेतवण्यांकडे मात्र ते दुर्लक्ष करतात. आजही असे दिसून येते की सामान्य माणसाच्या आकलनशक्तीत असे दिसून येते की, सामान्य माणसाच्या आकलनशक्तीत वाढ झाली असली तरी, ती एवढी नाही की आधुनिक म्हणवून घेणाऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांप्रमाणे विचार करतील. मानवाला महानतेची शिकवण देणे महत्त्वाचे आहे. पूर्वकालीन संतांना मानवतेच्या महानतेचे गणित सामान्य जनतेच्या मनात ढळकपणे मांडता आले. पण कमकुवत आकलनशक्तीच्या बांधवास समजून घेण्याची वृत्ती असली, सांभाळून घेण्याची समज असली, तर बुद्धिप्रामाण्यवादी परंपरा आणि आधुनिक विज्ञाननिष्ठ विचार यांचा योग नक्कीच घडवून आणेल. आजच्या या भीषण जागतिक समस्येने मनुष्यजातीला ग्रासले आहे. मानवाने निर्माण केलेल्या संहारक शक्ती विनाशकारी ठरू शकतात. आपल्या मनात अज्ञानाचा शत्रू दडलेला आहे. तो आळसरूपी अजगरच मनाभोवती वेटाळे घालून बसला आहे. ते घालवण्यासाठी एक आध्यात्मिक शक्तीचे तेज मनात नवचैतन्य निर्माण करते. त्या चैतन्यांनीच सर्व भेदभाव मिटतील. तेच चैतन्य जीवनातील अनंत अडचणी सोडवण्यास मदत करेल. त्या चैतन्य शक्तीचे तेज साक्षात विश्ववृत्तीचे अनंत दृश्य दाखवते. ते दृश्य दिसण्यासाठी नव्या उत्साहाने मानवतेच्या शिकवणीचा ध्यास घेतला पाहिजे. तीच खरी शिकवण ठरेल. ती शक्ती आध्यात्मिकतेत आहे.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)