‘चूक कशी होते? प्रथम वीतभर, नंतर वावभर नि शेवटी गावभर.’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 07:26 PM2020-02-20T19:26:30+5:302020-02-20T19:26:51+5:30

‘लेकुरे उदंड झाली, तेणे लक्ष्मी निघोन गेली’ परिस्थिती सर्वसाधारण असताना अनेक मुलं होणं म्हणजे दारिद्रयाला आमंत्रण देण्यासारखंच आहे. याच नावाच्या ‘लेकुरें उदंड जालीं’ या नाटकात एक गमतीदार संवाद आहे

Article on Mistakes and corrections | ‘चूक कशी होते? प्रथम वीतभर, नंतर वावभर नि शेवटी गावभर.’

‘चूक कशी होते? प्रथम वीतभर, नंतर वावभर नि शेवटी गावभर.’

googlenewsNext

रमेश सप्रे

चूक आणि सुधारणा

अण्णांच्या बोलण्यात नेहमी अर्थपूर्ण म्हणी असतात. कधी कधी वाटतं की सध्याच्या ज्येष्ठ मंडळींच्या पिढीनंतर भाषेतील म्हणी नष्ट होणार की काय? आजची इंग्रजी माध्यमात शिकणारी पिढी कधी आपल्या भाषेतल्या म्हणी, वाक् प्रचार, अलंकार वापरेल याची शक्यताच नाही. शिवाय मोबाइल वापरणारी मंडळी तर एकमेकांना पाठवतात त्या संदेशामध्ये (मॅसेजेस्) भाषेतील स्वरसुद्धा वापरत नाहीत. मग म्हणी वगैरे वापरणं अशक्यच. असो. कालाय तस्मै नम:।

तर त्या दिवशी अण्णा एके ठिकाणच्या चौरस्त्यावर वाट चुकले. म्हणजे सरळ जायचं ते उजवीकडे वळले. रस्ते एकमेकाला जोडलेले असल्याने सुरुवातीला चूक झाली ती अगदी थोडी होती; पण जसजसे पुढे गेले तशी ती चूक वाढत गेली नि शेवटी दुस-याच गावाला पोहोचले. हा अनुभव सांगताना अण्णा म्हणाले, ‘चूक कशी होते? प्रथम वीतभर, नंतर वावभर नि शेवटी गावभर.’
जीवनातील सगळ्या चुका अशाच वाढत राहतात इतक्या की पुढे त्या चुका वाटतच नाहीत. सुरुवातीला एकच प्याला दारू घेतली ती एक एक प्याला वाढत पुढे व्यसन बनली अन् संसाराचा सत्यानाश झाला. हा अनेकांचा करुण अनुभव आहे. असं म्हणतात एक चूक करणं हा माणसाचा स्वभाव आहे; पण क्षमा करणं हा देवाचा गुण आहे. (टू र्अ इज ह्युमन बट फर्गिव्ह इज डिव्हाईन) म्हणजे चुका होतच जाणार. अर्थात यामुळे त्या क्षम्य ठरत नाहीत.

एक वात्रटिका (विनोदी कविता) आहे. पूर्वी कवी मंडळींची आर्थिक परिस्थिती फार बिकट असे. त्याला उद्देशून लिहिलंय. ‘एक होता कवी. त्याला पडलं स्वप्न. स्वप्नातून उठला नि त्यानं केलं लग्न. लग्न करून झोपला ते खूप वेळानं उठला. उठल्यानंतर त्यानं केली दुसरी चूक. (म्हणजे पहिली चूक लग्न  केलं नि मूल झालं ही दुसरी चूक) आज त्याच्या घरी तो व त्याची पत्नी धरून एकूण दहा चुका आहेत.’
समर्थ रामदासांनी या संदर्भात सावधानतेची सूचना दिलीय.

‘लेकुरे उदंड झाली, तेणे लक्ष्मी निघोन गेली’ परिस्थिती सर्वसाधारण असताना अनेक मुलं होणं म्हणजे दारिद्रयाला आमंत्रण देण्यासारखंच आहे. याच नावाच्या ‘लेकुरें उदंड जालीं’ या नाटकात एक गमतीदार संवाद आहे. ‘मुलंच ती! त्यांना काय कळतंय? ती व्हायचीच.’
इथं मुलांना कळण्या-न कळण्याचा प्रश्नच नाहिए. प्रश्न आहे तो आई वडिलांना कळण्याचा. त्यांच्याकडून अशी चूक होता कामा नये. झालीच तर लगेच म्हणायला तयार, ‘मुलं ही देवाची देणगी आहे.’ या चुकीमुळे भोगावं लागतं ते मुलांनाच. आणखी एक उदाहरण. एका युद्धात एका सैन्याला रसद (धान्यपुरवठा) हवी होती. त्यांनी एका सैनिकाला घोडय़ावरून वेगात जाऊन रसद पाठवण्याचा निरोप द्यायला सांगितलं.’ त्या सैनिकाच्या घोडय़ाच्या नालेचा (हॉर्स शू) एक खिळा पडला होता. तो वेळेवर ठोकून घेतला नाही. साहजिकच घोडय़ाला नीट धावता आलं नाही. निरोप पोचायला उशीर झाला. परिणामी जिंकत आलेलं युद्ध त्यांना हरावं लागलं. त्यांच्या पराभवाचं कारण म्हणजे त्या घोडय़ाच्या नालेचा निखळलेला खिळा. साधी चूक पण केवढं मोठं पराभवाचं दु:ख देऊन गेली.

माणूस म्हणून जन्माला येऊनही आपण काही मूलभूत चुका करतच राहतो. याचं संतांना वाईट वाटतं. एक म्हणजे माणूस सदाचाराऐवजी भ्रष्टाचार करत राहतो. यामुळे जास्त मिळालेल्या पैशातून देहाच्या सुखसोयींची अनेक साधनं खरेदी करतो. यात आपण जी चूक करत असतो ती आपल्या लक्षातही येत नाही; परंतु संतांना वाईट वाटतं. ते म्हणतात अरे भ्रष्टाचार करणं म्हणजे आपला आत्मा विकणं. याचा अर्थ आत्मा विकून देहाला सुख मिळवायचं, जे कधीही कायमचं नसतं. यात कोणता विवेक किंवा शहाणपणा आहे?’
एक फार सुरेख सुविचार आहे. चूक करण्याच्या मानवी स्वभावाबद्दल म्हटलंय.

आर्किटेक्ट-इंजिनियरनं केलेली चूक इमारतीभोवती उंच उंच झाडं वाढवून झाकता येते. डॉक्टरांनी केलेली चूक जाळता किंवा पुरता येते. वकिलांनी केलेली चूक वरच्या कोर्टात दुरुस्त केली जाऊ शकते; पण शिक्षकानं केलेली चूक पिढय़ानपिढय़ा चालू राहते. जो नियम शिक्षकांना तोच पालकांनाही लागू पडतो. म्हणून शिक्षकांनी आणि पालकांनी शक्यतो चूक करायला नको. चुकून चूक झालीच तर ती लगेच सुधारायला हवी. आपल्या मुलांना सावध करायला हवं.

कोणत्याही चुकीची खरी सुधारणा आपली आपणच करायची असते. तरच ती ख-या अर्थानं प्रभावी होते. नारदांनी वाल्याला रामनाम मंत्र दिला; पण आपल्या आधीच्या जीवनात घडलेल्या पापांची, चुकांची खरी सुधारणा त्यानं स्वत:च केली. संतसद्गुरूंना मानवाच्या सर्वात मोठय़ा चुकीबद्दल खूप वाईट वाटतं. ती चूक म्हणजे विचारी, विवेकी मानवजन्म मिळून सुद्धा अविचारानं, अविवेकानं वागून माणूस आपलं खूप नुकसान करून घेतो. चांगली कर्म, योग्य विचारसरणी, सर्वाविषयी कृतज्ञता सहसवासात असलेल्या सर्व जीवांची निरपेक्ष सेवा अशा गुणांमुळे माणूस जीवनात पदोपदी होणा:या चुका टाळू शकतो. झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप झाला पाहिजे. यावेळी जे पश्चातापाचे अश्रू ढाळले जातात त्याला ज्ञानेवांनी ‘अनुताप (पश्चाताप) तीर्थ’ म्हटलंय. चुका सुधारण्यासाठी कोणत्याही तीर्थक्षेत्रात जाणं किंवा पवित्र गंगास्नान करणं यापेक्षा अनुतापतीर्थात (पश्चातापाच्या अश्रूत) न्हाऊन पवित्र होणं चांगलं हो ना?

Web Title: Article on Mistakes and corrections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.