अध्यात्म आणि न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 09:34 AM2018-10-23T09:34:43+5:302018-10-23T09:36:52+5:30
अध्यात्म आणि न्यूटन ही जरा न पटणारी गोष्ट वाटेल. परंतू न्युटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमाने तो एक तत्त्वज्ञानी होता. अध्यामाची त्याला चांगली जाण होती, हे लक्षात येते.
- सचिन व्ही. काळे, जालना
न्यूटन हा महान शास्त्रज्ञ १६४२ - १७२६ या काळात होऊन गेला. तो एक गणितज्ञ, खगोल शास्त्रज्ञ, धर्म शास्त्रज्ञ, लेखक, भौतिक शास्त्रज्ञ व नैसर्गिक तत्त्वज्ञानी म्हणून ओळखला जातो. त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधाणे साऱ्या जगाचे लक्ष आपल्या कडे वेधून घेतले. तसे प्रत्येक व्यक्तीला हे माहित आहे की आकाशात फेकलेली प्रत्येक वस्तू जमिनीवरच येऊन पडते. झाडाला लागलेली फळे पिकल्यानंतर झाडापासून वेगळी झाली की जमिनीवरच येऊन पडतात. न्यूटनने हा शोध लावण्यापूर्वी याचा प्रत्येक व्यक्तीने अनुभव घेतला होता. परंतू त्यामागचे शास्त्रीय तत्व शोधणारा न्यूटन हा एकमेव अवलिया होता. त्याने गुरुत्वाकर्षणाचा जसा सिद्धांत मांडला. तसेच त्याने विश्वात असणाऱ्या गतीवर सिद्धांत मांडून अंध:कार युगाला प्रकाशाची वाट दाखवली. नुसतीच ही वाट दाखवून तो थांबला नाही, तर त्याकाळातील अंध:कार झेलणाऱ्या मानवास अध्यात्माची ओळखही करून दिली.
अध्यात्म आणि न्यूटन ही जरा न पटणारी गोष्ट वाटेल. परंतू न्युटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमाने तो एक तत्त्वज्ञानी होता. अध्यामाची त्याला चांगली जाण होती, हे लक्षात येते. त्याचा हा गतिविषयक तिसरा नियम मानवी आयुष्यात किती चपखलपणे बसतो. हे लक्षात येते. काय सांगतो हा त्याचा गती विषयक तिसरा नियम? ‘प्रत्येक क्रिया बल समान परिणामांचे एकाचवेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात.’
अध्यात्म आणि हा सिद्धांत याचा कुठे ही अर्थार्थी संबंध दिसून येत नाही. परंतू हा सिद्धांत अध्यात्माच्या अगदी जवळचा. या साठी या सिद्धांताचे एक उदा. लक्षात घेतले पाहिजे. त्या उदाहरणातून न्यूटन आणि अध्यात्म लक्षात येते. ‘जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते. तेव्हा बंदूक गोळीवर क्रिया बल प्रयुक्त करते. त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो. हे क्रियाबल त्याचवेळी समान प्रतिक्रया बल विरुद्ध दिशेने बंदुकीवर प्रयुक्त करते.’ म्हणजेच क्रिया बल व प्रतिक्रिया बल समान मापाचे असतात. या उदाहरणातून न्यूटनने सिद्धांताची तर मांडणी केलीच. परंतू त्याने हेही दाखवून दिले की, अध्यात्म हे शिकवते की व्यक्तीचे मन निर्विकार, शुद्ध, निस्वार्थ असेल तर व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीप्रती प्रेम, आदर, मान- सन्मान व्यक्त करतो. म्हणजेच या मन शुद्धतेमुळे इतर व्यक्ती वर तो हे प्रेमाचे क्रिया बल प्रयुक्त करतो. परिणामी तसेच प्रतिक्रया बल समोरच्या व्यक्तीकडून तितक्याच मापाचे प्रतिक्रया प्रेम बल त्याला व्याजासह परत मिळत असते. म्हणजे न्युटनचा हा तिसरा नियम आपल्या रोजच्या जीवनात तंतोतंत लागू होतो. आपण दैनंदिन जीवनात जसे इतरांप्रती भाव ठेवू. तशाच भावना समोरच्या व्यक्तीच्या आपल्या प्रती राहतील.
व्यक्तीचे मन शुद्ध, निर्विकार, प्रेमळ असल्यास त्याच्या मनात राग, द्वेष मत्सर, वासना अशा प्रकारच्या नकारात्म भावना उत्पन्न होत नाही. या भावनांवर तो विजय मिळवतो. सदैव सकारात्मक उर्जा त्याच्या मानत कार्य करत असते. या सकारत्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला आत्मिक आनंदाचा, ईश्वराचा तसेच स्व: चा शोध घेता येतो. एकदा व्यक्तीला स्व: चा बोध झाला की, त्याच्या मनात समोरच्या व्यक्ती प्रती प्रेम, आदर, मान सन्मान या प्रकारच्या सकारात्मक भावना उत्पन्न होतात. त्याच्या कृतीतून, बोलण्यातून ही सकारात्मक उर्जा बाहेर पडू लागते व तशाच प्रकारची अनुभूती तो इतर व्यक्तींकडून प्राप्त करू लागतो.
हाच तर न्युटनचा गती विषयक तिसरा नियम नाही का? क्रिया बल व प्रतिक्रिया बल समान मापाचे असतात. हीच दिव्य ज्ञान प्राप्ती तथागत गौतम बुद्धांना झाली. तसेच श्रीकृष्णाने भगवत गीतेत सांगितले. जसे कर्म कराल तसे फळ तुम्हाला मिळेल. चांगले कर्म केले तर चांगलेच फळ तुम्हाला प्राप्त होईल. अन्यथा वाईट केले की वाईटच अनुभव तुमच्या नशिबी येतील. हाच तर न्युटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे.
अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध घेणे. हा शोध घेताना शांत चित्ताने मन एकाग्र करणे. मनातील अशुद्ध विचार बाहेर काढणे. शुद्ध विचारांनी मनाची, स्व ची ओळख करून घेणे. एकदा ही ओळख झाली की आपल्या मानत सकारात्मक भाव निर्माण होऊ लागतात.
शरीरातील क्रिया बल वाढून इतरांप्रती प्रेम, ममता, आदर, जिव्हाळा या सारख्या भावना निर्माण होऊन. त्याच प्रकारचे प्रतिक्रिया बल समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या प्रती निर्माण होऊ लागते. परिणामी आपल्या जीवनातील दु:खांची संख्या कमी होऊन सुखाचा साठा वाढू लागतो. व्यक्ती आत्म्याच्या जवळ जातो. त्याने ईश्वर प्राप्ती होते असे म्हणतात.
अशाच प्रकारचे त्यांचे जीवन संत तुकारामांचे नव्हते काय? संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून, जीवनातून हेच अध्यात्म आपल्या समोर मांडले. ईश्वर भक्ती हा त्याचा मार्ग दाखवून दिला. देव दगडामध्ये नसून तो चराचरामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. हीच शिकवण संत एकनाथ, संत, तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत कबीर व गौतम बुद्ध या सर्वांनी त्यांच्या अभंग व दोह्यांमधून करून दिली.
महान शास्त्रज्ञ न्यूटन याने गतीचा हा तिसरा नियम मांडून हेच सिद्ध केले की, ज्या प्रकारे आपण इतरांप्रती भावना ठेवू. त्यांच्या त्याच भावना आपल्या प्रती राहतील. म्हणजे एक प्रकारे न्यूटनने वैज्ञानिक अध्यात्मच आपल्या समोर मांडले. आपण समोरच्या व्यक्तीला प्रेम दिल्यास तसेच प्रेम आपल्याला त्याच्याकडून मिळेल. हाच तर न्युटनचा गती विषयक तिसरा नियम आहे.