कला आणि विज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:45 AM2018-04-17T03:45:11+5:302018-04-17T03:45:11+5:30
मानवी जीवन ही एक खूपच गुंतागुंतीची प्रक्रि या आहे. अनादी काळापासून मानव त्यास समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक विधीद्वारे मानव जीवनाच्या या रहस्याला समजण्याचा प्रयत्न करीत आहे.
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय
मानवी जीवन ही एक खूपच गुंतागुंतीची प्रक्रि या आहे. अनादी काळापासून मानव त्यास समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक विधीद्वारे मानव जीवनाच्या या रहस्याला समजण्याचा प्रयत्न करीत आहे. याच कारणामुळे कालांतराने अनेक विषय निर्माण झालेले आहेत. जसजसा विकास होत गेला तसतसे विषयाचे उपविषय निर्माण होत गेले व मानवाचा शोध सूक्ष्मापासून सूक्ष्मतमाकडे वाढत गेला. अशी एक वेळ होती, जेव्हा केवळ एकच विषय होता, तो म्हणजे तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञानात जीवनातील सर्व मूलतत्त्व व त्याच्या जिज्ञासेचे विवेचन केलेले आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या मूलतत्त्वाच्या प्रयोगाद्वारे रहस्योद्घाटन झाले व त्याचे कारण समजले, तेव्हा तेव्हा विज्ञानाची निर्मिती होत गेली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र इ. अशाचप्रकारे निर्माण झालेले आहेत. यामुळेच सर्व महान शास्त्रज्ञ हे तत्त्वज्ञानी होते.
ज्या विषयाचे दाखले मिळाले व ज्यांना प्रयोगाद्वारे सिध्द केले जाऊ शकत होते, तेथे विज्ञान निर्माण झाले. परंतु हे विज्ञान आजही पूर्ण नाही, याचे कारण म्हणजे वस्तूंच्या व पदार्थांच्या अनंत संभावना अजूनपर्यंत संपलेल्या नाहीत. विज्ञानाच्या विरुध्द काही असे विषय निर्माण झालेत, जिथे पुराव्याची काही आवश्यकता नाही. हे विषय म्हणजेच मानवाच्या कल्पना व विचार यांच्याद्वारे जीवनात सौंदर्य व रस निर्माण करतात. सौंदर्य व रस निर्माण करणाऱ्या विषयांना कलेच्या श्रेणीत ठेवले गेले आहे.
कलेचे विषय जीवनात एक उमेद व आकर्षण निर्माण करतात. अर्थात वस्तूंची निर्मिती विज्ञानाद्वारे होते, परंतु त्याला रंग व सुंदर आकार देण्याचे काम कलेद्वारे होते. म्हणूनच विज्ञान व कला हे दोन्ही जीवनाचे अभिन्न अंग आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते मानवाच्या मस्तिष्काचे डावा आणि उजवा असे दोन गोल आहेत. उजवा गोल विज्ञान व तर्काशी संबंधित आहे. याउलट डावा गोल कला व तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक मानवाचा डावा किंवा उजवा गोल हा त्याचे कार्य, आवड-निवड यानुसार विकसित होत असतो. परंतु परिपूर्ण व्यक्तिमत्त्व त्याचेच असते, ज्याच्या दोन्ही गोलांमध्ये समन्वय व संतुलन असते आणि हे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा तुमच्या जीवनात विज्ञान व कला या दोन्हीला महत्त्व दिले गेले पाहिजे.