आनंद तरंग - पूर्णत्वाची प्राप्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:29 AM2020-02-19T03:29:47+5:302020-02-19T03:29:51+5:30
दिवससुुद्धा शांतपणे बसू शकणार नाही. ती काही ना काहीतरी करणारच
सद्गुरू जग्गी वासुदेव
कोणत्याही कृतीमुळे परिपूर्णता साध्य करता येत नाही. तुम्ही केलेल्या एखाद्या कृतीमुळे परिपूर्णता लाभणार नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही एकामागून एक; कोणती ना कोणती कृती का करत असता? ती पूर्णत्वाकडे जाणारी वाटचाल आहे. जेव्हा तुम्ही अतिरिक्त कृती करणाऱ्या लोकांना विचारता की, ते तसे का करत आहेत, तेव्हा ते उत्तर देतात, काय करणार? उदरनिर्वाह, पत्नी, मुले या सर्वांची काळजी कोण घेईल? पण सत्य हे आहे, तुम्ही त्यांच्या सर्व गरजा भागवल्या तरी, ती व्यक्ती एक
दिवससुुद्धा शांतपणे बसू शकणार नाही. ती काही ना काहीतरी करणारच. त्याचे कारण असे की, तुमच्या आंतरिक स्वरूपाने अजून परिपूर्णता प्राप्त केली नाही आणि तुम्ही कृतींद्वारे तसे करण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्या हातून घडणारी कृती, तुमचे अन्न किंवा तुमची सुखे याकरता घडत नसून; त्या सर्व परिपूर्णतेच्या शोधात घडत आहेत. हे जाणीवपूर्वक घडले असेल किंवा अजाणतेपणे घडले असेल, पण त्या कृती अमर्याद होण्याचा शोध सूचित करतात. जर तुमच्या आंतरिक स्वरूपात पूर्णत्व असेल, तरच तुमचे आयुष्य परिपूर्णता प्राप्त करू शकेल. जर तुमच्यात, तुमच्या आंतरिक स्वरूपाने पूर्णत्व प्राप्त केले असेल, तर तुम्हाला कोणत्याही बाह्य कृतीची आवश्यकता भासणार नाही. जर बाह्य परिस्थितीने काही कृतीची मागणी केली, तर तुम्ही ती आनंदाने करू शकता. तसे करण्याची जर आवश्यकता नसेल, तर तुम्ही शांतपणे डोळे मिटून बसू शकता. जेव्हा एखादी व्यक्ती अशा अवस्थेला जाऊन पोहोचते, जिथे तिला कोणतीही कृती करण्याची आवश्यकता भासत नाही, तेव्हा ती व्यक्ती असीम, अमर्याद झाली आहे, असे आपण म्हणू शकतो. याचा अर्थ असा नाही की, ती व्यक्ती अजिबातच काही काम करत नाही. परंतु आंतरिक पूर्णतेसाठी तिला कृतीची आवश्यकता नाही. ती कृती करण्यासाठी बांधील नाही. कृतिरहितसुद्धा ती व्यक्ती परिपूर्ण आहे.