वाचनसंस्कृती जोपासू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:06 AM2019-01-25T04:06:34+5:302019-01-25T04:06:42+5:30
‘वाचन’ एक सवय आणि संस्कृती म्हणून जोपासणे अतिशय आवश्यक आहे.
- सद्गुरू जग्गी वासुदेव
‘वाचन’ एक सवय आणि संस्कृती म्हणून जोपासणे अतिशय आवश्यक आहे. वाचनाचा प्रभाव हा व्हिडीओ पाहणे किंवा कॉम्प्युटर गेम्स खेळण्यापेक्षा अतिशय वेगळा आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये अजिबात सारखेपणा नाही. वाचनामुळे तुमच्या मनाला आणि तुमच्या अंतर्दृष्टीला एक अतिशय वेगळ्या प्रकारचा व्यायाम घडतो. आजच्या तरुण पिढीला व्हिडीओ पाहणे किंवा अशा प्रकारच्या इतर गोष्टी करण्यापेक्षा, वाचनाची सवय लागावी, यासाठी काहीतरी पावले उचलली जातील, अशी आशा आहे. दृक्श्राव्य माध्यमांमधूनसुद्धा बरेच काही शिकायला मिळते, आणि त्यांच्या परीनं ती प्रभावीसुद्धा आहेत, परंतु वाचनात अधिक गहनता, अधिक सखोलता आहे. बहुतेक लोक आज जे काही करत आहेत, त्याऐवजी जर त्यांनी अधिक वाचन केले, जर ते एके ठिकाणी बसले आणि लक्ष केंद्रित करून वाचन केले तर ते अधिक शांत, अधिक विवेकी बनतील आणि जीवनाकडे अधिक सखोलपणे पाहतील, कारण वाचन ही एक प्रकारची ध्यान-धारणा आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता त्याला ध्यान-धारणा म्हणतात. ही एक प्रकारची साधना आहे, कारण तुमचे मन ज्याप्रकारे कार्य करते, त्यात निश्चितपणे सुधारणा होते. इलेक्ट्रॉनिक्सचे आकर्षण वरचढ होत आहे, आणि एक समाज म्हणून, आपण वाचनाची संस्कृती गमावता कामा नये. आज लोकांची मुख्य समस्या म्हणजे, ते जीवनाकडे अधिक सखोलपणे पाहण्याची हातोटी हरवून बसले आहेत. आज लोक प्रत्येक गोष्टीकडे वरकरणी पाहतात आणि मला वाटतं की काही दृक्श्राव्य माध्यमं याला कारणीभूत आहेत. मी त्यांच्या विरोधात नाही, कारण एक माध्यम म्हणून ते खूपच चांगले आहे, पण बहुतेकदा मला असे वाटते की ते वाचनाला पर्याय होऊ शकत नाहीत.