स्नान महात्म्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:15 AM2017-11-04T03:15:18+5:302017-11-04T03:15:47+5:30
सृष्टीचक्र अव्याहत चालू असतं. दिवस आणि रात्र एकापाठोपाठ एक येत-जात असतात. उदयाचलावर दिनकराच्या आगमनाची वार्ता विविध रंगाच्या छटा देतात. कोवळं सूर्यबिंब आभाळात येण्याआधीचा प्रहर महत्त्वपूर्ण मानला जातो.
- कौमुदी गोडबोले
सृष्टीचक्र अव्याहत चालू असतं. दिवस आणि रात्र एकापाठोपाठ एक येत-जात असतात. उदयाचलावर दिनकराच्या आगमनाची वार्ता विविध रंगाच्या छटा देतात. कोवळं सूर्यबिंब आभाळात येण्याआधीचा प्रहर महत्त्वपूर्ण मानला जातो. पहाट प्रहर, राम प्रहर आणि सूपर्व अशा शुभपर्वावर स्नान करण्याचा पर्व काळ मानला जातो. यामुळे आरोग्य उत्तम राहतं. तनाच्या आरोग्यासह मनाच्या आरोग्याचा लाभ होतो.
स्नानाचे तीन प्रकार आहेत: नित्य स्नान, नैमित्तिक स्नान आणि काम्य स्नान! नित्य स्नान नदीवर, विहिरीवर, तळ्यावर करणे सध्याच्या काळात शक्य नाही. म्हणून गृहस्नान करण्याचा सोपा प्रकार सर्वत्र रूढ झाला आहे. स्नानासाठी तांबं किंवा पितळ धातूचं पात्र वापरल्यास त्वचा निरोगी राहते.
जन्म, मृत्यू, श्राद्ध अशा प्रसंगी केल्या जाणाºया स्नानाला नैमित्तिक स्नान म्हणतात. त्याचप्रमाणे ग्रहण, संक्रांत, पर्वकाल, तीर्थयात्रा अशा निमित्ताने केले जाते ते काम्यस्नान!
काम्यस्नानामध्ये वैशाख स्नान, कार्तिक स्नान, माघ स्नान याचा प्रामुख्याने समावेश आहे. पापाचा क्षय आणि पुण्याचा संचय हा या स्नानाचा प्रमुख हेतू असतो.
गंगा, गोदावरी, कृष्णा अशा सरितांमध्ये स्नान करण्यासाठी हजारो लोक जातात. पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेवाला साक्षी ठेवून अर्घ्य प्रदान करून स्नान करण्याची प्रथा आहे. आपल्या पूर्वजांनी आणि ऋषींनी प्रयोग करून स्नानाचे प्रकार आणि त्यापासून प्राप्त होणारा लाभ कथन केला.
देहाची शुद्धी करून निरोगी शरीराची प्राप्ती हा मूळ उद्देश स्नानामध्ये आहे. स्नान करताना भगवंताची स्तुती, स्तोत्र म्हटल्यानं विधात्याचं स्मरण घडतं. त्यामुळे मनामधील मलिन विचार देखील धुतले जातात. मनाची मरगळ नाहिशी होते. सकारात्मक विचारांची ऊर्जा प्राप्त होते. स्वच्छता.... शुद्धता.... पवित्रता या तीन गोष्टींचा स्नानाने सहजपणानं लाभ होतो. दु:खाला दूर सारण्याची शक्ती प्राप्त होते. नैराश्याला थारा दिला जात नाही. रोजच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणजे स्नान! म्हटलं तर नित्यक्रम.... साधा... सोपा! परंतु विशिष्ट वेळेला.. अंग मर्दन करून.... नद्यांची नामावली व भगवंताचं नामस्मरण करून केलेलं स्नान अत्यंत लाभदायी ठरतं.