सकारात्मक व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 02:14 AM2019-08-24T02:14:38+5:302019-08-24T02:14:57+5:30
‘विचार हेच जीवन आहे.’ सारांशाने विचारांचा उपवास अर्थात नकारात्मक विचारांना मनात थारा न देता, सदैव चांगल्या विचारांचा स्वीकार होय.
- ब्रह्मकुमारी निता
प्रत्येक समस्येचे, दु:खाचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. एखादा आजार ठीक करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा आपण वापर करतो, पण आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी कडू औषधे, तसेच रोजच्या रोज काही नियम पाळले जातात. त्याचप्रमाणे, दु:ख, समस्या नष्ट करण्यासाठी आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करण्यासाठी विचारांना सकारात्मक दिशा देणे तितकेच महत्त्वाचे आहे. पूर्ण दिवस कदाचित सकारात्मक राहणे हे खूप मोठे आव्हान असू शकेल, पण दिवसभरात फक्त एक तास आपण नियमितपणे मनाला सकारात्मक विचारांनी भरण्याचा प्रयत्न अवश्य करावा. हा तासाभराचा अभ्यासही मनाला सुखद, तसेच शक्तिशाली बनविण्यास मदत करू शकतो. शरीर कार्यरत ठेवण्यासाठी जसं अन्न ग्रहणाच्या दिवसातल्या तीन ते चार वेळा आपण निश्चित करतो. या अन्नपदार्थांद्वारे शरीराला आवश्यक अशी सर्व जीवनसत्त्वे मिळावी, यावर विशेष लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे, मनाला आवश्यक असणारे पवित्र, शक्तिशाली, तसेच सुविचारांचीसुद्धा वेळ निश्चित करावी, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये यावी. आपल्या विचारांचा शरीरावर खूप मोठा प्रभाव पडतो, हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच मनाची तार ईश्वराशी जोडून विचारांची शुद्धी सतत करत राहणे हे आवश्यक आहे. भक्तिमार्गामध्ये उपवास तोच करू शकतो, ज्याची ईश्वरावर श्रद्धा, तसेच विश्वास आहे. विचारांचा उपवास म्हणजे प्रत्येक विचार स्व-स्मृतीत, तसेच ईश्वरस्मृतीत राहून करणे. थोडक्यात म्हणजे, विचारांद्वारे ईश्वराबरोबर केलेला वास म्हणजेच विचारांचा उपवास. जीवनरूपी गाडीचे विचार हे चालक आहेत. ज्या दिशेने हे विचार जातील, त्या अनुसार आपले जीवन बनेल. या वस्तुस्थितीला समजणे महत्त्वपूर्ण आहे. ‘विचार हेच जीवन आहे.’ सारांशाने विचारांचा उपवास अर्थात नकारात्मक विचारांना मनात थारा न देता, सदैव चांगल्या विचारांचा स्वीकार होय.