‘मारो गरबो घुमतो जाय!’ दुर्गामातेची पूजा करून, तिच्यासमोर पाचवी माळ बांधावयाचा दिवस
By दा. कृ. सोमण | Published: September 25, 2017 07:07 AM2017-09-25T07:07:20+5:302017-09-25T07:10:50+5:30
गरबा आणि नवरात्र यांचे अतूट नाते आहे. कदाचित, तुम्ही फाल्गुनी पाठकची गाणी ऐकली असतील. तुम्ही रंगीत पेहेराव करून, वाद्यांच्या तालावर ठेका धरणारे सुंदर गरबा नृत्यही पाहिले असेल.
गरबा आणि नवरात्र यांचे अतूट नाते आहे. कदाचित, तुम्ही फाल्गुनी पाठकची गाणी ऐकली असतील. तुम्ही रंगीत पेहेराव करून, वाद्यांच्या तालावर ठेका धरणारे सुंदर गरबा नृत्यही पाहिले असेल. आता नवरात्र उत्सव हा काही केवळ धार्मिक राहिलेला नाही. तर तो सांस्कृतिक, सामाजिक झाला आहे. आज
आपण गरबा नृत्याबद्दल आणि त्या वेळी गायल्या जाणा-या
गीतांबद्दलही माहिती करून घेणार आहोत.
गरबा नृत्य
गरबा हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. गरबा शब्दाचा उच्चार ‘गरबो’ असाही केला जातो. राजस्थानमध्येही गरबानृत्य प्रसिद्ध आहे. गरबा या लोकनृत्याला आता आधुनिक नृत्यकलेत स्थान मिळालेले आहे. या नृत्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि नृत्य पाहण्यासाठी अनेक लोक तिकीट काढून जात असतात.
पूर्वी नवरात्रांत देवीजवळ सच्छिद्र घटात अखंड दीप लावून ठेवीत असत. त्या घटाला ‘दीपगर्भघट’ असे म्हणत. या दीपगर्भ शब्दातील काही वर्णांचा लोप होऊन ‘गरबा’ हा शब्द राहिला, असे संशोधकांचे म्हणणे आहे. गुजरातमध्ये काही ठिकाणी बायकांचा गरबा नवरात्रांत नऊ दिवस चालतो. नंतर पुरुषांचा गरबा दस-यापासून सुरू होतो.
गरब्याची गीते
गरब्याच्या वेळी सुमधूर गीते सुंदर तालात म्हटली जातात. देवीची पारंपरिक गीते म्हटली जातात. त्याचप्रमाणे कृष्णलीलेचीही गाणी म्हटली जातात.
मीरेप्रमाणे गोकुळातील सामान्य स्त्रीही गोकुळातल्या कान्ह्याला ‘कलेजारी कोर’ म्हणजे ‘काळजाचा तुकडा’ असे म्हणते. उदाहरणासाठी एक प्राचीन पारंपरिक रचनाच देतो.
‘तांबा का लोटया भरया जलसे रे।
पीवानो वालो परदेश छे रे।।
बई, म्हारो कान्हो कलेजा री कोर छे रे।
कोर छे, कोर छे, कोर छे रे।
बई, म्हारी सोना री अंगुठी उपर
मोर छे रे।।
याचा अर्थ असा आहे की, तांब्याचा लोटा पाण्याने भरला; पण ते पाणी पिणारा मात्र परदेशात आहे. माझा कान्हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. बाई, माझ्या सोन्याच्या अंगठीवर मोर आहे. माझा कान्हा ‘कलेजारी कोर’ आहे.
गरबी आणि गरबा
गरब्याचे ‘गरबा’ आणि ‘गरबी’ असे दोन प्रकार आहेत, हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. ‘गरबी’ ही साधारणत: वैष्णवांची आहे. त्यामुळे ‘गरबी’मध्ये राधाकृष्णाचे वर्णन केलेले असते. ‘गरबा’ हा सामान्यत:: शाक्त म्हणजे, शैव पंथीयांचा समजतात. गरबा गीते अंबाजी, बहुचरा, काली अशी दुर्गा रूपांसंबंधी असतात. ‘गरबा’ आणि ‘गरबी’ यांच्या गायनाच्या पद्धतीमध्येही फरक आहे. देवीच्या आरती
नवरात्रांत देवीची पूजा झाल्यानंतर आरती म्हटली जाते. तबकात प्रज्वलित निरांजन देवतेला ओवाळण्याला ‘आरती’ असे म्हणतात. ‘आरती’ हा शब्द ‘आरात्रिक’ या शब्दावरून आला. आरत्यांविषयी अधिक माहिती आपण उद्या पुढील लेखात पाहू या. आज देवीला नमस्कार करून प्रार्थना करू या...
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी
नमोऽस्तु ते।।