मानसिक शांततेसाठी श्रद्धा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:28 PM2018-12-18T17:28:35+5:302018-12-18T17:31:03+5:30
जीवन संघर्षमय आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती आहे. जिवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या जगात आपल्याला ...
जीवन संघर्षमय आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती आहे. जिवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या जगात आपल्याला कोणीच सहकार्य करणारे नाही, आपण सर्वस्वी निराधार आहो, कसे होईल आपले. या विचारातून आलेली मानसिकता, आर्थिक दारिद्र्य आणि कौटुंबिक कलह, गैरसमज, शारिरीक आणि मानसिक व्याधी या सर्व बाबींमुळे माणुस खचून जातो. यातून आधार सापडतो त्याला आध्यात्मिक विचारधारेचा. कोणती तरी चित्शक्ती ज्याला देव संकल्पना म्हणता येईल, त्याकडे तो वळतो. एका जागतिक सर्वेक्षणानुसार असे प्रत्ययास आले आहे की, जगातील ७५0 कोटी लोकांपैकी ७00 कोटी लोक आस्तिकवादी श्रद्धा जोपासतात. श्रद्धा, भक्तीमुळे जर मानवाला सुखद अनुभव येत असेल, तर त्याला अंधश्रद्धा म्हणून टीका टिपणी का व्हावी? यावर अभ्यासकांनी विचारमंथन करुन प्रबोधन केले पाहिजे, असे मनोमन वाटते. केवळ हा प्रकार अंधश्रद्ध आहे, असे म्हणणाऱ्यांनी यावर मार्गदर्शन तरी केले पाहिजे. शासनानेसुद्धा या दृष्टीने उपाय सुचवावेत, जेणेकरुन मानसिकता आणि विचार स्थिरता येऊ शकेल.
धार्मिक आणि भक्ती संपदेला श्रेष्ठत्व देणाºया विधायकतेवर फक्त टिका टिपणी करुन भागणार नाही. ‘कर्मे ईशू भजावा’ ही विचारधारा जनमानसात रुजविल्या गेली पाहिजे. मानवतावादी कार्य करणारी भारतवर्षात जी काही संस्थाने आहेत, त्यात शेगाव (बुलडाणा) येथील श्री गजानन महाराज संस्थानचा लौकिक आहे. भक्ती आणि सद्कार्याचा सुंदर समन्वय येथे आहे. म्हणूनच दरवर्षी कोट्यवधी भक्तगणांची मांदियाळी येथे येत असते. मानसिक अनुभूती या ठायी श्रद्धावानांना प्राप्त होते, म्हणूनच असे म्हणावेसे वाटते, श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा प्रश्न कळल्या पाहिजेत.
आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मराठी मायबोली असणाºया संतांनी कल्याणकारी समाज या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न केले.
आजच्या स्पर्धेच्या, गतिमान युगात चंगळवादी जीवनशैलीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे सुख आनंदाऐवजी दु:ख निर्माण होत आहे. भौतिक सुखवादासाठी आम्ही नको त्या तडजोडी जीवनात स्वीकारत आहो, त्यामुळे नीती जीवनाला तिलांजली दिल्या जात आहे. सध्याच्या २१ व्या शतकात मंदिरे, प्रार्थना स्थळे भरमसाठ वाढली, भाविक जनाची प्रचंड गर्दीही दिसून येत आहे, परंतु भक्ती भावनेचा ओलावा त्यात किती? हा प्रश्न दिसून येतो. संत म्हणतात की, कर्मयोग आणि भक्ती योगाचा आचार धर्म पालन न करता केवळ कर्मकांडाने आनंदाभूती कशी येणार? आनंदाचे डोही आनंद तरंग हा संत तुकोबारायांचा विचार समजण्यासाठी आपल्याला विचार अवस्थेकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.
- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे (शेगाव)
शेगाव (जि. बुलडाणा)