भज गोविंदम ...भज गोविंदम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:54 PM2020-04-25T17:54:49+5:302020-04-25T17:54:53+5:30

श्रीमद आद्य शंकराचार्यांनी बरिच स्तोत्रे लिहीली. काव्य कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच आचार्यांनी आपल्या काव्यरचनेतून दाखवून दिले आहे

Bhaj Govindam ... Bhaj Govindam ... | भज गोविंदम ...भज गोविंदम...

भज गोविंदम ...भज गोविंदम...

googlenewsNext

श्रीमद आद्य शंकराचार्यांनी बरिच स्तोत्रे लिहीली. काव्य कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच आचार्यांनी आपल्या काव्यरचनेतून दाखवून दिले आहे. लालित्यपूर्ण रचना, गेयता, अर्थभरित आशय, लय व शब्दसौंदर्य यामुळे ती स्तोत्रे पटकन पाठ होतात. माऊली म्हणतात, वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्वे परतत्व । स्पर्शु जैसा ॥ याप्रमाणे आचार्यांचे काव्य आहे.अल्प वयामध्ये चारही वेदाचे अध्ययन करुन प्रकांड पंडिताना वादविवादामध्ये हरवले. धर्मध्वज फडकत ठेवला. रुतंभरा प्रद्न्या प्राप्त असलेला हा महात्मा वेदातील तत्वज्ञान सहज काव्यात प्रगट करतो आहे आणि त्यांनी केलेले स्तोत्रे आजही लाखो लोकांच्या मुखोद्गत आहेत.
त्यातीलच एक स्तोत्र अतिशय प्रसिध्द आहे त्याचे नाव चर्पटपंजारीका स्तोत्र आहे. चर्पट म्हणजे खमंग आणि पंजरी म्हणजे खाद्य. हे स्तोत्र म्हणजे एक खमंग खाद्य आहे यात लालित्य,ओज, भक्ती आहे. हे पाठ करण्यास सोपे व मधुर आहे. मरण जवळ आले असता व्याकरणाचे पाठ सुख देत नाहीत तेथे गोविंदाला शरण जाणे हाच एक सर्वोत्तम उपाय आहे.
एक म्हातारा मनुष्य काशीमध्ये गंगेवर घाटावर व्याकरण घोकीत बसला होता. त्याच्या वयाकडे बघुन आचार्यांना नवल वाटले. जेव्हा पाठ पाठांतर करावयाचे होते त्या वयात केले नाही. बालपण गेले नेणता । तरुणपणी विषयव्यथा । वृध्दपणी प्रवर्तली चिंता । मरे मागुता जन्म धरी ॥ 
आणि आयष्याचा शेवट आला आणि हा व्याकरण घोकित बसला. खरे तर आता भगवंताचे नाम घेणे श्रेयस्कर असताना हा घोकीत बसला कि जे आता पाठांतर होऊ शकत नाही. म्हणून आचार्य म्हणतात, जेव्हा भगवंताने नियोजित केलेली वेळ म्हणजे मृत्यूची वेळ येते. तेव्हा तू पाठ केलेले व्याकरण तुझ्या रक्षणार्थ येणार नाहीत. म्हणून तू त्या गोविंदाचे भजन कर.
           जगदगुरू श्री तुकाराम महराज एका अभंगात म्हणतात, गोविंद गोविंद। मना लगलिया छंद॥  मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥
          खरे तर माणूस आयुष्यभर शिकत असतो. त्याला तसे वाटत नसते हा भग वेगळा. उच्चविद्याविभुषित माणसास वाटत असते कि आपली विद्या आपणास तारील, पण तसे घडत नाही. उलट अहंकार आडवा येतो. तो अहंकार भावनेला स्थान देत नाही. तो तर्कट वनवतो. प्रेमभक्तिला पोषक राहत नाही. त्यामुळे समाधान मिळत नाही. चार वेद, सतरा पुराणे, ब्रम्हसुत्रे, उपनिषदे संपादन केले परंतु चित्ताची तळमळ शांत झाली नाही. त्यावेळी त्यांना श्री नारद महर्षी नारदांनी भगवान श्रीकृष्णाच्या मधुर लीला वर्णन करायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी लीला वर्णन केल्यामुळे त्यांचे खरे समाधान प्राप्त झाले. म्हणून हे मानवा तू तर्कट बनण्यापेक्षा गोविंदाचे भजन कर.
                    भजन म्हणजे भज-भजति म्हणजे भज-सेवया म्हणजे सेवा करणे भजन करणे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम ॥  माउली म्हणतात, तेथ सेवा हा दारवंठा । तो स्वाधीन करि सुभटा । वोळगोनि ॥ भगवतप्राप्तिचा मार्ग म्हणजे भजन प्रेमाने त्याला आळवणे. तुम्ही करा घट पटा । आम्हि न वजो तया वाटा ॥                   घट, पट, वगैरे परिभाषिक शब्दांच्या जंजाळात आम्ही अडकणार नाही. कारण  प्रेमाविण नाही समाधान ॥ म्हणून हे जीवा तू गोविंदाचेच भजन करुन भगवतप्राप्ति करुन घे.

- हभप भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागावाताश्रम, चिचोंडी (पा.)ता. नगर
मो. ९४२२२२०६०३  
                  

Web Title: Bhaj Govindam ... Bhaj Govindam ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.