धन्य तुकोबा समर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:32 PM2019-03-24T12:32:24+5:302019-03-24T12:32:27+5:30

वेदांतातील प्रस्थानत्रयी म्हणजे दाशोपानिषदे, ब्रह्मसूत्र, भगवतगीता, या तिन्हीला प्रस्थानत्रयी म्हणतात. तसेच वारकरी संप्रदायातील प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश्वरी,

Blessed Tukaaba | धन्य तुकोबा समर्थ

धन्य तुकोबा समर्थ

googlenewsNext

मेलबोर्न (आॅस्ट्रेलिया) : वेदांतातील प्रस्थानत्रयी म्हणजे दाशोपानिषदे, ब्रह्मसूत्र, भगवतगीता, या तिन्हीला प्रस्थानत्रयी म्हणतात. तसेच वारकरी संप्रदायातील प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा अभंग गाथा यांना प्रमाण मानले जाते. वारकरी संप्रदायात एक आचारसंहिता आहे. ती म्हणजे वारकरी संतामधील प्रमाण मानलेल्या संतांचेच वांडमय प्रमाण मानायचे. त्यामुळे भेसळ होत नाही व सिद्धांतांची हानी होत नाही. कीर्तन प्रवचनामध्ये इतर कोणतेही संत महंत मोठे जरूर असतील. पण त्यांचे वांडमय प्रमाण धरले जात नाही. भगवद धर्म मंदिराचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी घातला असे म्हटले जाते. ‘ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया... तुका झालासे कळस, भजन करा सावकाश बहिणाबाई,’ त्याच तुकाराम महराजांचा आता बिजोत्सव आहे. तेव्हा अवघा वारकरी समाज देहूला दिंड्या, पताका घेऊन येणार व तुकोबारायांच्या नावाचा जयजयकार करणार. कोणत्याही संताचे खरे चरित्र म्हणजे त्यांचे वांडमय असते, ‘कारण झाड जाणिजे फुले, मानस जाणिजे बोले, भोगे जाणिजे केले ेपूर्व जन्मी’ तुमच्या बोलण्यावरून तुमचे अंतरंग सहज समजते तसेच तुमच्या लिखाणावरून तुमचे अंतरंग समजते. तुकाराम महाराजांचे एकंदर १४ टाळकरी होते. त्यापैकी रामेश्वर भट्ट हे अगोदर महाराजांचे विरोधक होते. अनुभव आल्यानंतर ते महाराजांचे शिष्य झाले. तेव्हा त्यांनी महारांजांचे वर्णन एका अभंगात केले आहे.
‘तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम’
धन्य तुकोबा समर्थ े जेणे केला हा पुरुषार्थ
जळी दगडासहित वहया े जैश्या तरियेल्या लाहया
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा े तुका विष्णू नोहे दुजा
नुसते तुकाराम तुकाराम म्हटले तरी यम घाबरतो म्हणजे काय ? तर ज्याने जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे नाम घेतले त्याचे अगणित पुण्य उत्पन्न होते व त्यामुळे त्याचे अंत:कारण शुध्द होते व शुध्द झालेल्या अंत:करणात ज्ञानाची लालसा निर्माण होते. आणि तो संतांकडे जातो व त्यांच्याकडून त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. यम, मृत्यू याची त्याला भीती राहत नाही कारण त्याला एक कळते कि आत्मा कधी मरत नाही आणि देह कधी राहत नाही. असे हे तुकाराम महाराज धन्य आहेत. त्यांनीच हा पुरुषार्थ केला आहे. त्यांच्या अभंगाच्या वह्या याच रामेश्वर भट्टाने इंद्रायणीत बुडवायला सांगितल्या होत्या व त्याची आज्ञा प्रमाण मानून महाराजांनी त्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या. त्यानंतर तुकाराम महाराजांनी १३ दिवस उपोषण केले आणि भगवंतानी त्यांच्या अभंगाच्या वह्या बाळ वेषात आणून दिल्या. तसेच ते अभंग लोकगंगेतही तरले. म्हणून तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू हे दोन नाहीत. ही अनुभूती याच रामेश्वर भट्टाची होती.
तुकोबाराय समर्थ कसे होते. याचे थोडक्यात आपण पाहू. समर्थ कोणाला म्हणतात, जो काही तरी अलौकिक कार्य करू शकतो. कर्तुम, अकर्तुम व अन्यथा कर्तुम असे कार्य करू शकतो त्याला समर्थ म्हणतात. तुकाराम महाराजांचे वैराग्य महान होते ते स्वत: म्हणतात. जाळोनी संसार बैसलो अंगणी किंवा प्रपंच वोसरो चित्त तुझे पायी मुरो किंवा सोने रूपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे हि त्यांची वृत्ती होती. प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांनी तुकाराम महाराजांना पालखीचा मान व धन द्रव्य पाठविले होते पण महाराजांनी त्यांना नम्रपणे व परखडपणे उत्तर पाठविले. काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलची व्हावा, येर तुमचे वित्त धन, ते मज गोमांसासमान, एवढे वैराग्य चांगल्या सन्याशामध्ये, महंतामध्येहि सापडत नाही. तुकाराम महाराज तर परखडपणे बोलतात.
‘भिक्षापात्र अवलंबिणे’ ‘जळो जिणें लाजिरवाणें’ ‘ऐसीयासी नारायणें’ ‘उपेक्षीजे सर्वथा’ ‘देवापायीं नाहीं भाव’‘भक्ति वरी वरी वा’ ‘समर्पिला जीव नाही,तो व्यभिचार’‘जगा घालावें सांकडे’ ‘दीन होऊनि बापुडे’ ‘हेंचि अभाग्य रोकडें मूळ हा अविश्वास’ ‘काय न करी विश्वंभर’ ‘सत्य करितां निर्धार’ ‘तुका म्हणे सार द्रुढ पाय धरावे’
विवेकासह वैराग्याचे बळ, धगधगीत अग्नी ज्वाळ जैसा, विवेकासह वैराग्य असावे लागते नुसते वैराग्य काही कामाचे नाही. विवेक नसेल तर ते वैराग्य म्हणजे वैताग ठरतो. महाराजांचे विवेक वैराग्य दोन्हीहि प्रखर होते. अंतरीची जोती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छादिली, तेथीचा आनंद र्ब्हम्हंडी न माये, उपमेसी देऊ काय सुखा, किंवा ऐसा ज्याचा अनुभव, विश्व देव सत्यत्वे, तुजमज नाही भेद, केला सहज विनोद, रज्जू सपार्कार, भासियेले जगडंबर असे अनेक प्रमाणे देता येतील.
महाराज समाजभिमुख सुद्धा होते. जेव्हा देहू व परिसरात १२ वर्षे दुष्काळ पडला तेव्हा तुकाराम महाराजांनी आपले स्वत:चे धान्याचे कोठारे लोकांसाठी रिकामे केले. त्यांचा सावकारीचा व्यवसाय होता . त्यांनी अशा कठीण प्रसंगी लोकांचे सर्व कर्ज व्याजासह माफ केले. त्यांचा पनवेलपर्यंत व्यापार होता. ‘तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे’ असेहि त्यांनी लोकांना समजवले. पंढरीचे पिढीजात वारकरी होते. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिराचा जीर्णोद्धार केला व प्रत्येक एकादशीला आळंदीला येवून कीर्तन करीत होते. शेती कशी करावी, गोपालन कसे करावे याविषयी स्वतंत्र अभंग महाराजांनी लिहिले आहेत. ‘अनुरेणूया थोकडा’ तुका आकाशा एवढा’ अणुवादाचा विचारही त्यांनी मांडला. राजाने कसे वागावे, साधूने कसे आचरण ठेवावे, प्रपंचात कसे वर्तन असावे त्यांनी त्यांच्या पत्नीला केलेला उपदेश फार सुंदर आहे.
वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येराने वाहवा भार माथा, असे नुसते म्हणून ते थांबले नाहीत तर वेदाचा अर्थ सुद्धा सांगितला. वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे, इतका सुलभ वेदाचा अर्थ अजूनपर्यंत कोणीही सांगितला नव्हता. म्हणूनच तुकाराम महराजांचा लौकिक सर्वत्र पसरला आणि प्रस्थापितांना नेमके हेच नको होते. म्हणून त्यांनी त्यांना नाना प्रकारे त्रास दिला. कोर्टात दावे दखल केले अनंत अडचणीना तोड देत तुकाराम महाराज जीवनात यशस्वी झाले व भागवत धर्म मंदिराचे कळस ठरले. वा-याहाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख ज्याचे नारायण या तुकोक्ती प्रमाणेच जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर राहील यात शंका नाही.

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागवाताश्रम , चिचोंडी (पाटील)ता.नगर.
ह. मु. मेलबोर्न , आॅस्ट्रेलिया
मो. क्र. ६१+०४२२५६२९९१

Web Title: Blessed Tukaaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.