आनंद तरंग - दगड आणि न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 03:37 AM2019-11-08T03:37:16+5:302019-11-08T03:37:35+5:30
असा दोन तास हा व्यायाम करायचा. हे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती गडबडले आणि म्हणाले
विजयराज बोधनकर
एका न्यायाधीशांना पोटदुखीचा आजार जडला होता. खूप डॉक्टर, वैद्य झाले, पण आराम काही पडत नव्हता. कुणीतरी त्यांना लोणावळ्याच्या स्वामी विज्ञानानंदांचे नाव सुचविले. हाही उपाय करावा म्हणून न्यायाधीश स्वामी विज्ञानानंदांकडे गेले आणि आपला परिचय देत दुखणं सांगितलं. स्वामीजींनी ऐकून घेत औषध देण्याचं मान्य केलं. पण त्या अगोदर काही व्यायाम करावा लागेल अशी अट घातली व पुन्हा यायला सांगितलं. ठरल्या दिवशी, पुन्हा न्यायमूर्ती स्वामीजींकडे आले आणि स्वामीजी त्यांना मैदानात घेऊन गेले. तिथे एक दगड होता. स्वामीजी त्यांना म्हणाले की खाली वाकून हा दगड उचलायचा, चार पावलं चालायचं आणि पुन्हा खाली ठेवून पुन्हा दगड उचलून पुन्हा चार पावलं चालायचं.
असा दोन तास हा व्यायाम करायचा. हे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती गडबडले आणि म्हणाले, ‘अहो, मी न्यायाधीश आणि मला हे काय सांगताय?’ स्वामीजी म्हणाले की, पोटदुखी बरी करायची असेल तर हा व्यायाम तुम्हाला केलाच पाहिजे. तरच माझ्या औषधाचा परिणाम होईल. नाइलाजाने ते राजी झाले. पण दडपणाखाली ते दगड उचलून ठेवू लागले की आपल्याला कुणी बघत तर नाही ना, आपण न्यायाधीश आहोत. पण आपल्याला कुणी बघत नाही हे बघून हळूहळू त्यांच्यातली भीती गेली आणि चक्क दोन तास त्यांनी दगड उचलण्याचा व्यायाम केला. त्यानंतर पोटदुखी किंचित कमी झाली. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आणि तोच व्यायाम दोन दिवस सुरू ठेवला. त्यानंतर त्यांची पोटदुखी बंद झाली. त्याबद्दल स्वामीजींना विचारलं असता ते म्हणाले, तुमच्या पदाची ही पोटदुखी होती. आपण न्यायाधीश ही अहंकाराची भावना मनात बाळगल्याने त्याचा ताण सतत रक्तवाहिन्यांवर पडत पोटाला रक्तपुरवठा कमी व्हायचा. त्यामुळे पोटदुखी चालू राहिली. जेव्हा दगड उचलत होता तेव्हा अहंकार नाहीसा होत, शरीरावरचा तणाव नाहीसा होत पोटदुखी बंद झाली.