देह देवाचे मंदिर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 07:10 PM2019-02-23T19:10:57+5:302019-02-23T19:11:24+5:30

इंद्रिये हे अत्यंत बलवान आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड असलं तरी आवश्यक आहे.

Body is Temple of God | देह देवाचे मंदिर 

देह देवाचे मंदिर 

Next

- प्रा. सु. ग. जाधव

'देहाची आसक्ती ठेवू नका ' असे सांगणारे तथाकथित साधू किंवा संत हे स्वत:च देहाचे चोचले पुरविण्यात मग्न असल्याचे सर्वसाधारणपणे दिसून येते. असे का व्हावे? याचे उत्तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवतगीतेमध्ये दिले आहे. ते म्हणतात की इंद्रिये हे अत्यंत बलवान आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड असलं तरी आवश्यक आहे. मानवी देह हा विविध घटकांपासून अर्थातच पंचमहाभूतांपासून तयार झालेला असल्याने या प्रत्येक भूतांचे गुण देहामध्ये समाविष्ट आहेत. विविध प्रसंगी, विविध कारणामुळे पंचमहाभूतातील एखाद्या भुताचा प्रादुर्भाव जास्त होऊन प्रकृतिस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. देहाची जडणघडण सूक्ष्मपणे पाहिल्यास यामध्ये विविध विरोधी गुण असलेले घटकसुद्धा एकोप्याने नांदत असल्याचे आपल्याला दिसून येते. जसे पृथ्वी, आप, पेज, वायु आणि आकाश. या सर्वांचा उद्देश एकच की देहधारण करणाऱ्या जीवात्म्यास उच्चगती प्राप्त व्हावी आणि परमात्म्याचे सान्निध्य प्राप्त व्हावे. परंतु, बहुतांश सामान्य माणसांना आपण कशासाठी जन्मलो याचा विसर पडतो. ही माणसे देह पोषणामध्येच आपले आयुष्य व्यतीत करतात. अशांना ज्ञानेश्वर माऊलींनी 'ज्ञानहीन' असे म्हटलेले आहे.  ते म्हणतात-

‘शून्य जैसे गृह का  चैतंन्यविन देह तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीना’ (ज्ञा. ४..४०. १९४)

देहामधील चैतन्य निघून गेल्यानंतर  हा देह रिकाम्या असलेल्या घरासारखे होते.  त्याचप्रमाणे संमोहित झालेला  व्यक्ती ज्ञानहीन होतो आणि अशा ज्ञानहीन व्यक्तीला स्वकर्तव्य साधण्याचे विवेक राहत नाही. आपल्याला प्राप्त झालेले हे शरीर  एक दिवस टाकून जायचे आहे,  पंचमहाभूतातील प्रत्येक घटक आपल्याला परत करायचा आहे, याचे भान न राहिल्यामुळे अनर्थ होतो अर्थातच अशावेळी देह दु:खाचा डोंगर वाटू लागतो.  म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात- 

मग मेरूपासूनी थोर ेदेह दु:खाचेनि डोंगर दाटिजो पा परिभारे चित्त न दटे (ज्ञा.६.२२. ३६९)

त्या व्यक्तीला दु:खाचा पारावार राहत नाही. यावर उपाय सांगताना काही जण देह त्याग करा असं म्हणतात. देह त्याग करणे म्हणजे आजच्या भाषेत आत्महत्या करणे होय. हे चुकीचे आहे.  या देहाला माऊलीनी 'खोळ' अर्थात पिशवी मानून आपण आपल्या जागी राहावे, असे म्हटले आहे. याबाबत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात -

ते देह झोळ ऐसे मानुनि ठेले आपणचि आपण होऊनि जैसा मठ गगना भरुनी गगनची असे  (ज्ञा.८.५. ६०)

ज्याप्रमाणे मठामध्ये गगन भरून असतो आणि मग मठ फुटल्यावर  तो गगनात विलीन होतो.  त्याप्रमाणे देहाची आसक्ती न ठेवता त्याकडून  ध्येयप्राप्ती करून घेतली पाहिजे.  मनुष्याला सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती म्हणजे मृत्यूची.  कारण मृत्यू म्हणजे आपण संपलो,  ही धारणा सर्वसाधारणपणे माणसांमध्ये दिसून येते. अशा व्यक्ती स्वत:ला 'देह'  समजत असतात आणि ध्येयाकडे दुर्लक्ष करीत असतात.  अशा व्यक्ती आयुष्यभर देहपोषणासाठी विविध वस्तूंचा संग्रह करीत राहतात. अनेकवेळा तर त्यांना त्या वस्तूचा उपयोगही करता येत नाही.  मृत्यूप्रसंगी मात्र काहींना उपरती होते. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशावेळी त्या देहाकडून काहीही होणे शक्य नसते तरीही परंतु जर त्या व्यक्तीचा निर्धार असेल तर पुढच्या जन्मी देह धारण करून परमेश्वरप्राप्तीचा करून घेऊ शकतो.  म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे

तरी आता देह असो अथवा जाओ आम्ही तो केवळ वस्तूची आहोे का जे दोरी सर्पत्व वावो दोराचीकडूनिे (ज्ञा.८.२७. २४८)

देह जावो किंवा राहो आपण केवळ वस्तू अर्थात आत्मतत्त्व आहोत हे लक्षात ठेवावे.  यासाठी माऊलीने दृष्टांत दिला आहे की थोडा अंधार, थोडा प्रकाश अशावेळी दोरीलाच आपण साप समजून घाबरतो परंतु प्रकाश पडल्यानंतर तो साप नसून दोरी आहे याचे ज्ञान होते. असे झाल्यावर पुन्हा आनंद वाटतो.  म्हणून देह जाण्याची भीती वाटणे ही बाब म्हणजे दोरीवर साप दिसणे यासारखे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष न करता त्याचा उपयोग प्रगतीसाठी करणे, हेच मानवाचे मुख्य कर्तव्य आहे.

(लेखक यशवंत महाविद्यालय नांदेड येथे प्राध्यापक, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे सचिव आहेत)

Web Title: Body is Temple of God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.