विकत घेतला श्याम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:04 AM2018-02-15T03:04:19+5:302018-02-15T03:04:39+5:30
साहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते.
- डॉ. रामचंद्र देखणे
साहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते. काहींच्या शब्दांवर कुणाचा तरी प्रभाव असतो. कुणीतरी कुणाच्या तरी विचाराने प्रभावित होऊन आपले विचार मांडत असतात. एखादी निर्मितीदेखील पूर्णत: स्वयंभू आहे, असे वाटते. काही वेळा एखादी मूळ शब्दकृतीच पुन्हा नवे रूप घेऊन नव्या रूपाने स्वयंभू होऊन प्रकटते. अशी गमतीशीर उदाहरणे प्रतिभावंतांच्या जीवनात घडत असतात. प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर यांनी ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटासाठी
नाही खरचली कवडी दमडी ।
नाही वेचिला दाम ।
बाई मी विकत घेतला श्याम ।।
ही अतिशय सुंदर रचना लिहिली. ते गाणे आजही गुणगुणत राहावेसे वाटते. शब्दांची मधुरता आणि कल्पनेची सुरेखता गदिमांनी प्रत्येक चरणामध्ये ओतली आहे. हे गाणे मीराबार्इंच्या एका सुंदर हिंदी अभंगावरून सुचले आहे, हे गदिमांनी मान्य केले होते आणि संगीतकार सुधीर फडके यांनीही याच्या पाठीशी असलेल्या मीराबार्इंच्या रचनेचे मोठेपण सांगितले होते. संत मीराबार्इंची गौळणसदृश एक रचना आहे-
‘माई मैं ने गोविंद लीन्हो मोल ।
कोई कहे हलका, कोई कहे भारी
लियो तराजू तोल।।
मी तराजू मांडून गोविंदाला तोलून त्याचे मोल देऊन त्याला घेतलंय. ‘कोई कहे अनमोल’ असे हे गोविंदधन मला सहजासहजी मिळालेले नाही. मीराबार्इंची हीच संकल्पना गदिमा त्या गीतातून विस्तारतात आणि जन्मभराच्या श्वासाइतके हरिनाम मोजून मी त्याला विकत घेतलाय, असे सांगतात. प्रतिभावंतांच्या रचनांमध्ये समानता असते. कल्पना विस्ताराचे आणि कल्पकतेचे सौंदर्य असते; पण ते शब्दसौंदर्यही संतरचनेच्या प्रासादिक अभंगवाणीला समोर ठेवून जेव्हा अभिव्यक्त होते तेव्हा कविता आणि गीतही संतवाणीच्या अवस्थेला जाऊन पोहोचते.
गदिमांचा संतसाहित्याचा व्यासंग, अभ्यास आणि वाचन किती सूक्ष्म होते हे सांगायला नको. ‘गोविंद लीन्हो मोल’ आणि ‘विकत घेतला श्याम’ या दोन्ही रचना पाहिल्यावर मीराबार्इंचे भजन गदिमांच्या शब्दाने पुन्हा प्रकटते आणि दोन्ही रचनांमधून नामसंकीर्तन उभे राहते. तसेच गदिमांच्या प्रासादिक प्रतिमेचे उत्तुंग दर्शन घडते.