कॅक्टस आणि तुळस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 08:54 PM2019-09-26T20:54:24+5:302019-09-26T20:54:39+5:30
कुणाचं तरी पत्र येणार किंवा अमुक एक व्यक्ती येणार नाही तर भेटणार असं दिवसाच्या आरंभी वाटतं नि तसं घडतंही.
तुम्हा सर्वाना हा अनुभव असलेच. सकाळी उठल्यावर एखादी स्मृती किंवा विचार मनात येतो. कधीकधी एखादं दृश्य, एखादा अनुभव किंवा प्रसंग, एखादा कोणताही शब्द संथ सरोवरावर तरंग उठावा किंवा बुडबुडा याव त्याप्रमाणे पृष्ठभागावर येतो. विशेष म्हणजे अनेकदा याची प्रचिती आपल्याला त्याच दिवशी येते.
कुणाचं तरी पत्र येणार किंवा अमुक एक व्यक्ती येणार नाही तर भेटणार असं दिवसाच्या आरंभी वाटतं नि तसं घडतंही. इतकंच काय नकळत एखाद्या गाण्याची ओळ कुठून तरी तरंगत येते नि ओठातून बाहेर पडते. त्या दिवशी कुठंतरी ते पूर्ण गाणं ऐकायला मिळतं.
परवा उठल्या उठल्या एक शब्द असात क्षेपणास्त्रसारखा येऊन आदळला-कॅक्टस. कॅक्टस म्हणजे निवडुंग, एक काटेरी झाड, त्याची प्रतिमा समोर उभी ठाकतानाच पु. ल. देशपांडेंच्या असा मी , असा मी मधील प्रसंग आठवला. मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रसंग. खास पुलशैलीत ती मध्यमवर्गातील आई नव्हे मदर नव्हे मम्मी सर्वप्रथम घराच्या पुढच्या भागातील तुळस मागच्या दारी नेते नि तिथलं कॅक्टसचं रोपटं आणून दिवाणखान्यात ठेवते. पुढे खूप गंमतजंमत होते ते प्रत्यक्ष वाचलं किंवा पाहिलं पाहिजे.
पण तुळस मागे नि कॅक्टस पुढे हा बदल अतिशय मार्मिक आहे. आपण दैनंदिन जीवनात असे वरवरचे बदल करतो. जे प्रतीकात्मक वाटले तरी मुख्य गोष्टीशी तसे संबंधित नसतात. या प्रसंगावर चिंतन करत असताना तर कॅक्टसचं अवघं विश्वच समोर प्रकट झालं. पंतप्रधानांनी आपल्या वाढदिवशी कृतज्ञभावनेनं शेकडो विविध जातीप्रजाती असलेलं ‘निवडुंग उद्यान’- कॅक्टस गार्डन राष्ट्राला समर्पित केलं. ते कॅक्टस विश्व पाहून अक्षरश: चक्रावून जायला होतं.
काही कॅक्टस नागाच्या फण्यासारखे, तर काही गेंडेदार गरगरीत. सर्व प्रकारात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना असलेले तीक्ष्ण काटे. काही निवडुंगांना फुलंही येतात नि ती अतिशय काळजीपूर्वक काटे न टोचता काढली तर त्यांच्या अंतरंगात मधासारखा मधूर मकरंद असतो. निसर्गाची कमाल वाटते की इतक्या अणकुचीदार काटे असलेल्या काहीशा अनाकर्षक वनस्पतीला हे मकरंदाचं वरदान.
कॅक्टस एक शोभेचं झाड म्हणून दिवाणखान्यात ठेवलं जातं. काही तरी विचित्र जवळ किंवा समोर ठेवलं की स्वत:ला आगळं महत्त्व (स्टेटस) येतं हा अनेकांचा समज असतो. पण काही संशेधक वृत्तीची मंडळी अशा पूर्वी उपेक्षित, दुर्लक्षित असलेल्या वनस्पतींवर संशोधन करतात. त्याचे औषधी गुण शोधतात. प्रयोग करतात. मानवी जीवन सुखरुप बनवण्याचा ध्यास त्यांना लागलेला असतो.
अलीकडे आणखी एक उपेक्षित वनस्पती खूप म्हणजे खूपच प्रसिद्धीस आलीय, ती म्हणजे कोरफड म्हणजे कांटेकुवर किंवा अॅलोवेरा. या वनस्पतीला कल्पवृक्षाची पदवी द्यायला हरकत नाही.
कारण वैद्यक क्षेत्रात औषधी गुणधर्मामुळे अनेक गुणकारी औषधात कोरफडीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात तर अॅलोवेरानं क्रांतीच घडवलीय. साबण शाम्पू, निरनिराळी सौंदर्यक्रीम्स एक ना दोन अनेक उपयोग या मांसल पण काटेरी वनस्पतीचे आहेत. अजूनही संशोधन सुरूच आहे. एक संस्कृत सुभाषित या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखं आहे.
अमंत्रमक्षरं नास्ति, नास्ति मूलम् अनौषधम्
अयोग्य: पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभ:
खरंच या विश्वात संपूर्णत: निरुपयोगी असं काहीच नाही. आपण प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करून निरीक्षण -परीक्षण करून उपयोग मात्र करून घेतला पाहिजे. असं कोणतंही अक्षर नाही त्यात मंत्रसामर्थ्य नाही. पण मंत्रसिद्ध, मंत्रयोगी महात्म्यांनी ते सामर्थ्य त्या त्या अक्षरात निर्माण केलं पाहिजे.
त्याचप्रमाणे असं कोणतंही झाडाचं पाळमूळ नाही ज्यात औषधी गुणधर्म नाहीत. ते प्रयोगांती सिद्ध मात्र केले गेले पाहिजेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी एकही व्यक्ती नाही जी पूर्णपणे निरुपयोगी आहे. कोणता ना कोणता तरी गुण त्या व्यक्तीत असतोच, त्याचा कल्पक उपयोग करणारी मंडळी मात्र विरळाच असतात. अशा योजक, नियोजक संयोजक व्यक्तीच राष्ट्र घडवू शकतात. नुसते प्रयोजक काय कामाचे?
एकूण काय कॅक्टसच्या निमित्तानं ही चिंतन परंपरा सुरू झाली. ती प्रत्येकाला आपली बुद्धी, कल्पनाशक्ती, सृजनशीलता वापरून प्रत्येक गोष्ट जीवनपयोगी - राष्ट्र उपयोगी बनवली पाहिजे. तसा संकल्प मात्र केला पाहिजे.
महाभारतात युधिष्ठिराचं जीवन सूत्र आहे- धर्म रक्षति रक्षित: म्हणजे जो धर्माचं पालन करतो त्याचं पालन तो धर्मच करतो. यात थोडा बदल करून असं म्हणूया वृक्षो रक्षति रक्षित: आपण झाडांचं संवर्धन संगोपन करु या, मग ते वृक्षच आपलं जीवन सांभाळतील. अगदी कॅक्टससारखी काटेरी रोपटी सुद्धा. पाहा विचार करून.
- रमेश सप्रे