मनाच्या समत्वाचा ‘अनित्य’ हाच पासवर्ड..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 04:31 PM2020-02-08T16:31:22+5:302020-02-08T17:25:44+5:30

जिंदगी कैसी है पहेली हाय , कभी ये हसाये , कभी ये रुलाए .

'Change' is the password of mind equality | मनाच्या समत्वाचा ‘अनित्य’ हाच पासवर्ड..

मनाच्या समत्वाचा ‘अनित्य’ हाच पासवर्ड..

Next
ठळक मुद्देसुख आले तरी नाचू नका व दु:ख आले तरी रडू नका..

- डॉ. दत्ता कोहिनकर -

एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की, यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे. पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून तसेच एक घोडाबरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला. हे कळाल्यावर दुष्ट प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते. हाही क्षण निघून जाईल.... 
केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले,  महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे. राजा म्हणाला,  नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दु:खही राहत नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दु:खात खचू नये, सुखात नाचू नये.
 

हे क्षणही निघून जातील....
ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.

मित्रांनो, निसर्गाचा नियम ठरलेला असतो . कधी चांगल्या कर्माचे फळ तर कधी दुष्कर्माचे फळ वाट्याला येते. काहीही वाट्याला आले तरी ते परिवर्तनशील असते . म्हणून समत्वाचा अभ्यास करा . व सत्कर्माचे भागीदार व्हा . एका गाण्याचे बोल म्हणतात , जिंदगी कैसी है पहेली हाय , कभी ये हसाये , कभी ये रुलाए . शेवटी भगवान बुद्ध म्हणतात ना , अनित्य ही तो है । प्रत्येक गोष्ट अनित्य आहे . त्यामुळे सुख आले तरी नाचू नका व दु:ख आले तरी रडू नका . अनित्य हाच पासवर्ड आहे मनाच्या समत्वाचा .  

Web Title: 'Change' is the password of mind equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.