बदलती मनोवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:32 AM2018-10-15T09:32:58+5:302018-10-15T09:33:33+5:30

मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही.

changing mental situation | बदलती मनोवस्था

बदलती मनोवस्था

Next

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

मुलगा वर्षभर अभ्यास करतो. पण परीक्षा जवळ आल्या की मानसिक ताण घेतो. स्वत:चा स्वत:वर विश्वास नसला की, अशी मनोवस्था होते. अभ्यास हा आत्मविश्वासाने केला पाहिजे. मनापासून केला पाहिजे. स्मरणात ठेवला पाहिजे. मनावर घेऊन केलेल्या अभ्यासात आपली प्रगती दिसते. अभ्यासात ‘मन’ लागत नाही, अशा काही मुलांच्या तक्रारी असतात. काही मुले मन लावून अभ्यास करतात. यात ज्याच्या - त्याच्या बुद्धीनुसार, बुद्ध्यांकावरून त्यांची मनोवस्था बदलत जाते. मनावर घेऊन अभ्यास केल्यास बुद्ध्यांक उंचावतो. मनाला प्रसन्न ठेवणे अवघड काम आहे. पण प्रसन्न मनाने केलेला अभ्यास लक्षात राहतो. परीक्षा म्हटले की ताण येतोच! कारण ती परीक्षाच असते. इथे सतत जागृत अवस्थेत राहणे महत्त्वाचे असते. जागृत ‘मन’ आपल्या सवयींना बदलवते. मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही. कारण त्याचे स्थिरपण फक्त ईशचरण एवढेच असते. म्हणून तर संत तुकाराम महाराजांनी सांगितले. ‘‘आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया’’ ‘मन’ एकदा त्या ईश्वराच्या चरणाशी रत झाले की मग कुठेही धाव घेत नाही. तोेपर्यंत ते मन कुणाच्या आज्ञेत राहत नाही. मनाचे मालक मनच असते. कारण मनाला शक्ती बुद्धी देते. बुद्धीचा आत्मा. आत्म्याचे औदार्य मनावरच अवलंबून असते. मनाचे सुंदरपण त्या आत्मस्थितीवर निर्भर असते.

आत्म्याची स्थिती जशी असते, त्यानुसार मनाचे भाव बदलत जातात. परीक्षेला जाणारा मुलगा - सासरला जाणारी नववधू (मुलगी), यांचे भाव जवळपास सारखे असतात. इकडे परीक्षेला जाणाऱ्या मुलांचा पेपर छान गेला की भाव बदलतात. परीक्षेला जाण्यापूर्वीचे मन अन् नंतर पेपर छान गेल्यानंतरचे मन यात फरक आहे. तसेच सासरला जाण्यापूर्वीचे ‘मन’ अन् सासरला गेल्यास सासरच्या लोकांचे प्रेमाने भारावून गेलेले मन यात नक्कीच फरक असतो. मनाला नेहमी चांगले विचार करण्याची सवय लावा. ‘मन’ सुख-दु:खात बदलते. मनाची मनोवस्था ही बदलत जाणारी आहे. म्हणून संतांनीसुद्धा ‘मनालाच’ मोठेपण दिले आहे. मन गुरु, मन शिष्य, सर्वस्व ‘मना’वरच अवलंबून आहे.

Web Title: changing mental situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.