प्रभाते मनी राम चिंतीत जावा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:38 PM2019-12-14T18:38:18+5:302019-12-14T18:40:31+5:30
संसाराचे चिंतन केल्यास आपल्याला दुःख प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन केले तर सुख प्राप्त होईल.
- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांची रचना केली. त्यांनी मनाच्या श्लोकांतून मनाला उपदेश केला. अध्यात्मशास्त्रात मन नावाच्या इंद्रियावरच सगळे अवलंबून आहे. मानवी जीवनाचे अंतीम ध्येय मुक्ती हेच आहे पण प्रश्न असा आहे की, मुक्ती तरी कुणाला..? देहाला का..? आत्म्याला का..? मुक्त व्हावयाचे म्हणजे नेमके कशापासून मुक्त व्हावयाचे..? देहापासून तर सगळेच मुक्त होतात. आत्मा तर नित्यच मुक्त आहे कारण ते ईश्वरी चैतन्य आहे मग मुक्ती कुणाला..? तर ज्या वासनेमुळे पुन्हा पुन्हा अनेक देहांत जन्माला यावे लागते त्या वासनेपासून मुक्ती अभिप्रेत आहे कारण जन्म मरणाला कारण वासनाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात -
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ।
तोचि होय अंगे हरिरुप ॥
वासनेला कारण काय तर मन..! म्हणून श्रीसमर्थ मनाला उपदेश करतात, प्रभाते मनी राम चिंतीत जावा..!
आता मन म्हणजे तरी काय..? शास्त्रकार सांगतात -
संकल्प विकल्पात्मकं मनः..!
संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन..! अंतःकरणाचे चार भाग असतात.
१.मन
२.बुद्धी
३.चित्त
४.अहंकार
संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन.!
निर्णयात्मक भूमिका घेणारी वृत्ती म्हणजे बुद्धी.!
चिंतन करणारी चित्त.!
आणि
अहंभावात्मक वृत्ती म्हणजे अहंकार.!
एखाद्या विषयाचे सतत अनुसंधान असणे याला चिंतन असे म्हणतात. मनुष्य सतत कशाचे तरी चिंतन करीतच असतो. चिंतनाशिवाय तो राहूच शकत नाही पण चिंतन तरी कुणाचे करावे..? आत्मवस्तूचे की अनात्म वस्तूचे..? चिंतनाचा परिणाम सांगतांना शास्त्रकार सांगतात -
चिंतने चिंतने तद्रूपता..!
आपण ज्याचे चिंतन करु त्याचं स्वरुप आपल्याला प्राप्त होते. मग चिंतन कुणाचं करावे..? जर संसाराचे चिंतन केले तर संसाराचे स्वरुप आपल्याला प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन केलं तर देवाचे स्वरुप प्राप्त होईल. आता संसाराचे स्वरुप कोणतं आहे. तुकाराम महाराज म्हणतात -
दुःख बांदवडी आहे हा संसार ।
सुखाचा विचार नाही कोठे ॥
संसाराचे चिंतन केल्यास आपल्याला दुःख प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन केले तर सुख प्राप्त होईल. म्हणून श्रीसमर्थ या मनाला उपदेश करतात -
हे मना..! प्रभाते मनी राम चिंतीत जावा..!
( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणभाष - ८३२९८७८४६७ )