दान फलदायी करणारी अक्षय्यतृतीया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 03:14 PM2019-05-06T15:14:53+5:302019-05-06T15:16:11+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक
साडेतीन मुहूर्तांपैकी एक. वैशाख शुद्ध तृतीयेला हे नाव पडण्याचे कारण ‘मदनरत्न’ या ग्रंथात पुढीलप्रमाणे दिले आहे -
अस्यां तिथौ क्षयमुपंति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै
स्तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव
अर्थ - (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणन हिला मुनींनी अक्षय्यतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पित्तर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते.
या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा कृतयुगाचा (काहींच्या मते त्रेतायुगाचा) प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो. म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा -
पवित्र जलात स्नान, विष्णूची पूजा, जप, होम, दान व पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे व ते जमत नसेल तर निदान तिलतर्पण तरी करावे, असे सांगितले आहे. या दिवशी शिध्यासह उदकुंभही द्यायचा असतो. याशिवाय उन्हापासून संरक्षण करणाºया छत्री, जोडा इत्यादी वस्तूही दान द्यायच्या असतात. या व्रताची कथा अशी -
एक व्यापारी होता. तो नित्य दानधर्म करी व संतमहात्म्यांच्या कथा आवडीने ऐके. कालांतराने त्याला दारिद्र्य आले. पुढे एकदा त्याने असे ऐकले की, बुधवारी रोहिणीयुक्त तृतीया आल्यास त्यादिवशी केलेले दान-पुण्य अक्षय्य होते. मग तसा दिवस येताच त्याने ते सगळे केले. पुढल्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला. त्याने मोठमोठे यज्ञ केले व अनेक प्रकारचे वैभवही भोगले. पण तरीही त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही (भविष्योत्तर पुराण). याच दिवशी परशुरामाचा जन्म झाला. म्हणून या तिथीस प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून त्याला अर्घ्य देतात. स्त्रियांना हा दिवस महत्त्वाचा असतो. त्यांना चैत्रात बसविलेल्या चैत्रागौरीचे त्यादिवशी विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदी-कुंकूही करतात.
ऋषभदेव याने एक वर्ष आणि काही दिवस एवढ्या कालांतरानंतर हस्तिनापूरचा राजा श्रेयांस याच्या घरी या तिथीस उसाच्या रसाचे प्राशन केले. त्यामुळे राजाची भोजनशाला अक्षय्य झाली. म्हणून या तिथीस हे नाव पडले. यादिवशी आदिनाथ ऋषभदेवाची पूजा करतात व त्याला उसाच्या रसाचे स्नान घालतात.
अक्षय्यतृतीयेचे कर्म
- या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
- सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
- ब्राह्मण भोजन घालावे.
- या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.
- या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.
- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदि शुभ कामेही केली जातात.