बाळरूप परमात्म्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 04:49 AM2019-11-14T04:49:22+5:302019-11-14T04:49:26+5:30
कार्तिक महिना. याला क्वदामोदर मासही म्हणतात.
- शैलजा शेवडे
कार्तिक महिना. याला क्वदामोदर मासही म्हणतात. कृष्णाला प्रिय असलेला महिना. कृष्णाच्या बाललीलांचे वर्णन करण्याचा, ऐकण्याचा महिना. वात्सल्यरसात, भक्तिरसात भिजून जाण्याचा महिना...! परमात्म्याचे बाळरूप मनोमन आठवण्याचा महिना...!
गोजिरवाण्या मुठीत धरु नी, गोजिरवाणे पाय चिमुकले,
मुखी घालतो बाळकृष्ण तो, गोड असे ते किती सानुले,
वटपत्रावर पहुडलेले, शिशू मनोहर आनंदाचे,
हृदयी माझ्या अखंड राहो, बाळरूप ते, परमात्म्याचे।
जावळात त्या, कुरळ्या, कुरळ्या, मोरपीस ते खोचलेले,
काजळ भरले नेत्र आणखी, पायी मंजूळ घुंगुरवाळे,
नवनीताने माखलेले, वदन यशोदा लाडक्याचे,
हृदयी माझ्या अखंड राहो, बाळरूप ते परमात्म्याचे।
एकदा यशोदा कृष्णावर रागावली. त्याला उखळाला बांधू लागली... आदी नाही, अंतही नाही, आदिपुरु षाला,
आंतर नाही, बाह्यही नाही, सर्वव्यापकाला,
रूप गोजिरे घेतलेल्या, अव्यक्त अरूपाला,
बांधते, हरीस उखळीला, यशोदा कृष्ण कन्हैयाला।
खोड्या करूनी सतावतो, ऐकत मुळी नाही,
थांब ठेवते, तुला बांधुनी, हलायचे नाही,
दोन बोट तरी, अपुरी दोरी, गोपी हसू लागल्या,
बांधते, हरीस उखळीला, यशोदा कृष्ण कन्हैयाला।
अर्जुनवृक्षांच्या मधुनी, दामोदर गेला,
उखळ अडकले, बळे ओढले, कडाडध्वनी आला,
वृक्ष उन्मळूनी कोसळताना, चमत्कार झाला,
सिद्ध पुरु ष ये, त्यांच्यामधूनी, वंदिती कृष्णाला।
अग्नीसम तेजस्वी कांती, प्रकाशल्या दशदिशा,
पुन्हा-पुन्हा वंदिती, मग ते, कृष्णपरमपुरुषा,
शापित आम्ही, कुबेरपुत्र, दर्शनयोग आला,
परममंगला, तुझ्यामुळे रे, स्वर्ग पुन्हा पातला।
बांधते, हरीस उखळीला, कृष्ण कन्हैयाला।
त्या बालरूपातील परमात्म्याला परत परत नमस्कार..!