मनाला नव्या उमेदीने जगायला शिकवतो आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 09:10 AM2019-12-02T09:10:06+5:302019-12-02T09:10:53+5:30

मनाला नव्या उमेदीने जगायला शिकवतो तो आत्मविश्वास असतो. आत्मविश्वासातून माणूस निर्भयपणाने जगतो.

Confidence can be described as a belief in oneself | मनाला नव्या उमेदीने जगायला शिकवतो आत्मविश्वास

मनाला नव्या उमेदीने जगायला शिकवतो आत्मविश्वास

Next

मनाला नव्या उमेदीने जगायला शिकवतो तो आत्मविश्वास असतो. आत्मविश्वासातून माणूस निर्भयपणाने जगतो. त्याच्या अस्तित्वाची बीजं त्याच्या कृतीतून दिसतात. मनातला आवाज शब्दातून बाहेर पडतो. तत्परतेची सूर्यकिरणे त्याच्यात आढळतात. तो मनातून खूश असतो. जे समोर येईल त्याला तो समर्थपणे हाताळतो. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत नाही. आपल्या सामर्थ्याची जाणीव तो जगाला करून देतो. जगण्याची नवी उमेद घेऊन प्रपंचरूपी मैदानात उतरतो. आपल्या मनाला तो विखरू देत नाही. स्वत:च स्वत:मध्ये अनेक गोष्टी शोधतो. आत्मविश्वासाने त्याला उत्साहाची कोवळी किरणे भारावून टाकतात. स्वत:च जगणं सुसह्य करतो. आपल्यातला अहंकार चुरगाळून टाकतो. जीवनाच्या विविध पातळ्या गाठतो. शक्यता, संभाव्यता या शब्दांना त्याच्याकडे वाव नसतो. मनातला गाभारा आत्मविश्वासाने ठासून भरलेला असतो. त्यामुळे तो कोणत्याही कार्याची मोहर उमटवतो. मनाचा आकांत थांबवतो. मनात कसलाही कोलाहल माजू देत नाही. काळाला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो.

मनातली धडधड थांबवतो. आत्मविश्वास मनाच्या गाभाऱ्यातून येतो. प्रत्येक माणसाच्या मनात वादळ असते. ते विविध प्रकारच्या विचारांनी भिनलेले असते. ते वादळ शमविण्याची ताकद आत्मविश्वासू माणासाकडे असते. आत्मविश्वासाच्या गाभाऱ्यातच धैर्याचा जन्म होतो. म्हणून आत्मविश्वास अंगी बाळगा. आत्मविश्वासामुळे अनेक स्वप्नं साकार होतील. आत्मविश्वासू माणसे मनातल्या मनात आनंद उपभोगतात. आपल्या आयुष्यातील अंधारातल्या वाटा नाहीशा करतात. आपल्या प्रत्येक कर्तृत्वाला प्रकाशाच्या वाटेवर नेत असतात. मनात पेरलेले संस्कार विचारांच्या खोलीत नेऊन प्रत्यक्ष कृतीत उमटवतात. मनाचे पावित्र्य नेहमी जपतात. मनात नेहमी उमेदीचा गुलमोहर फुलवतात. आपल्याच मनाला ते आवारही घालतात व वेळप्रसंगी मोकळेही सोडतात. समाजात वावरताना ते आपल्या विचारांनी इतरांना प्रभावी करतात. आत्मविश्वासू माणसे कुणाचे वाईट चिंतित नाहीत. त्यांना त्यांच्यातला आत्मविश्वास बळ देतो. स्वत:वर विश्वास नसलेली माणसेच वाईट चिंतित असतात. समोरच्याचे मत त्यांना सहन होत नाही.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

Web Title: Confidence can be described as a belief in oneself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.